सिडकोतर्फे 21 जून, 2019 रोजी पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमास नवी मुंबईतील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.  आर्ट ऑफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात सुमारे 2500 नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रशांत ठाकूरश्रीमती मंदाताई म्हात्रे, विधानसभा सदस्य, बेलापूर आणि सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांची उपस्थिती लाभली. 

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केल्यानंतर सन 2015 पासून हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनात उत्तम आरोग्य व मन:स्वास्थ्य हवे असल्यास योगाभ्यासाला पर्याय नाही हे लक्षात घेता पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून, म्हणजे सन 2015 पासून सिडकोतर्फे दर योग दिनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील नागरिकांमध्ये योगविद्येचा प्रसार व्हावा व त्या योगे त्यांना आरोग्य प्राप्ती व्हावी हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. 

या वर्षीच्या योग दिन कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंग व नवी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन या संस्थांतील योग प्रशिक्षकांकडून उपस्थितांना विविध योगासने, प्राणायम, सूर्यनमस्कार इत्यादींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत उपस्थितांकडून सलग तीन मिनिटे वीरभद्रासन आसन करून घेऊन गिनीज बुकमधील जागतिक विक्रमाचा प्रयत्न करण्यात आला. योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे अडीच हजार नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. यात शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी व ज्येष्ठ नागरिक यांचादेखील मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.