जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून खारघरमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने रुग्णालयातील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. स्वप्ना पाटकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. स्वप्ना पाटकर यांनी महिलांनी स्वयंसिद्ध होणे ही काळाची गरज असल्याचे सांगत अनेक उदाहरणे दिली. महिला आजच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार, नोकरी  करून पैसे कमावतात. परंतु, त्यांचे व्यवस्थापन देखील तेवढेच महत्त्वाचे असते व त्यासाठी घरातील पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतः त्यांनीच त्याचे व्यवस्थापन करण्यात पुढाकार घ्यावा, हे पटवून दिले. 

सदर कार्यक्रमप्रसंगी टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, उपसंचालक डॉ. एच. के. व्ही नारायणन, डॉ. नविन खत्री, माजी संचालिका डॉ.शुभदा चिपळूणकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत भट, प्रशासकीय अधिकारी एम. वाय. शेख हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नयना बारसकर व स्नेहल पांडव यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.