मला सांगा आपण घर किंवा कार्यालय (ऑफिस) घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करतो ? जागा, बजेट, लोन, ते किती आकर्षक आहे ह्याचा… आणि अशाच बऱ्याच दिखाऊ गोष्टींचा आपण विचार करतो, पण ती वास्तू ‘वास्तूशास्त्राप्रमाणे’ आहे का हे आपण बघतो का?

कोणतीही वास्तू ही मांगल्याचं प्रतिक मानलं आहे. घर घेणं, ते सजवणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. पण बऱ्याचदा ते वास्तूशास्त्रा प्रमाणे नसल्याने घरात अचानक विचित्र गोष्टी घडू लागतात. पण आपल्या लक्षात येत नाही की अस का घडतंय? पण जर हीच वास्तू वास्तुशास्त्राच्या आधारावर असेल तर ती वास्तू सुंदरही असते आणि त्यामध्ये शांतताही प्रस्थापित होते.

वास्तू कशी असावी, त्यातली प्रत्येक वस्तू कुठे असावी, रंगसंगती कशी असावी, सकारात्मक उर्जा कशी संतुलित ठेवावी… असे अजून बऱ्याच मुद्यांविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेणारच आहोत, पण सध्या थोडक्यात घर आणि कार्यालय (ऑफिस) वास्तुशास्त्राप्रमाणे कसे असावे हे जाणून घेऊया. हल्लीच्या काळात सगळ्याच गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे करता येतातच असं नाही. जरी अगदी १००% त्या सांभाळता आल्या नाहीत तरी अगदी बेसिक गोष्टीचं भान ठेवणं हे हिताचं ठरतं. तुम्ही म्हणाल असं का? तर मला सांगा पाण्याजवळ अग्नी आला आणि अग्नी जवळ वायू (हवा) आला तर… काय होईल?? अगदी सोपं आहे… नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी गोंधळ होईल. म्हणूनच घरात बेडरूम, किचन, देवघर, हॉल हे वास्तूशास्त्राप्रमाणे असणं आवश्यक आहे. घरातील किचन हे आग्नेय दशेला असले पाहिजे, बेडरूम नैऋत्येस असावे. देवघर ईशान्य दिशेला असावे तर प्रवेशद्वार हे उत्तर, पूर्व दिशेस असणे शुभ मानले आहे. मुलांची खोली पूर्व किंवा वायव्य दिशेला असणे योग्य आहे.

त्याचप्रमणे कार्यालय शास्त्रप्रमाणे असेल तर त्यातून शांती, पैसा, प्रसिद्धी, सुख अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पदरात पडतात. तुमचा बिजनेस कोणता आहे? त्याचं स्वरूप काय आहे? ह्यावरून कोणत्या ठिकाणी काय असावं ते ठरवलं जातं. पण तरीदेखील मुलभूत गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आता घरात ज्याप्रमाणे किचन हे आग्नेय दिशेला असावं, त्याचप्रमाणे कार्यालयात (ऑफिस) आग्नेय कोपऱ्यात जनरेटर रूम, सर्वर / कम्प्युटर रूम किंवा इलेक्ट्रिक रूम असावी. नैऋत्य दिशेला मुख्यव्यक्तीची खोली, पण त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं हे त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून सांगता येते, म्हणजे त्या व्यक्तीला कोणती दिशा लाभते हे जन्म तारखेवरून ठरते. ईशान्येला रिसेप्शन, देवघर, तिजोरी किंवा पाण्याचा साठा असणे लाभदायी ठरते तर वायव्येला विझिटर्स रूम किंवा स्टोअर रूम असावी.

ह्या अगदी बेसिक गोष्टी सांभाळायला हव्यात, यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात आनंद, पैसा, निरोगी स्वास्थ्य ह्या सगळ्याचा उपभोग घेऊ शकाल. अशा बऱ्याच गोष्टीं आपण माझ्या पुढील लेखात जाणून घेणार आहात.


About the Author: Amruta Amey Amberkar is the Vastu Consultant & Spiritual Healer. Vastu Expert-Masters in Vastu and pursing PhD in Vastu Shastra. You can get connected to the author through [email protected]