आपले मत हा लोकशाहीने दिलेला हक्क असून मतदान करून हा हक्क बजाविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघात  विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. रुपाली भालके, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सत्वशिला शिंदे यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चंद्रकांत तायडे यांचेमार्फत चुनाव पाठशाला हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना मतदानाचे महत्व पटवून देऊन त्यांच्यामार्फत त्यांचे आई, वडील, नातेवाईक, शेजारी यांनी 29 एप्रिल 2019 रोजी मतदान करावे असा संदेश प्रसारित करण्यात येत आहे.

याशिवाय चुनाव पाठशाला उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना व्हि.व्हि. पॅट या निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणा-या मशिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. सेक्टर 7 सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात असलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात अशाप्रकारचे प्रात्यक्षिक आयोजित करून माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे ज्येष्ठांमार्फत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश प्रसारित करण्यासाठी सहकार्य करणेबाबत ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वेस्टेशन व वर्दळीच्या ठिकाणी “होय, मी मतदान करणारच!” असे शिर्षकस्थानी लिहिलेले मोठे कोरे फलक लावण्यात आले असून त्यावर स्वाक्षरी करून नागरिक आपला मतदान सहभाग असल्याचे नमूद करीत आहेत. या अभिनव संकल्पनेला नागरिकांचा चांगला सहभाग लाभत आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकच्या कचरा वाहतुक करणा-या गाड्यांवरील ध्वनीक्षेपक यंत्रणेव्दारे 29 एप्रिलला मतदान करण्याबाबत आवाहन करणारी संगीतमय जिंगल प्रसारित करण्यात येत आहे. याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गल्ली गल्लीत मतदान करण्याबाबतचा प्रभावी प्रचार करण्यात येत आहे.

या मतदान मोहिमेला अधिक व्यापकता देण्यासाठी 2 एप्रिलला सी.बी.डी. बेलापूर विभागात विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली काढण्यात येत असून आपापल्या शाळेच्या आवारापासून रॅलीची सांगता होणा-या सेक्टर 1 सी.बी.डी. बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानापर्यंत 29 एप्रिलला मतदान करावे असा संदेश रॅलीव्दारे प्रसारित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांव्दारे त्यांचे पालक व ओळखीच्या व्यक्ती, तसेच महिला बचत गट, महाविद्यालयीन विद्यार्थी, यांच्यासोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यापर्यंतही मतदान करण्याबाबतचा संदेश प्रभावीरित्या पोहचविण्यात येत आहे.