बॉलिवूडमध्ये २०१८ हे वर्ष चित्रपटांपेक्षाही सगळ्यात जास्त गाजलं ते सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्यांमुळे! २०१७ च्या डिसेंबर महिन्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली व त्यानंतर सोनम कपूर, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या आघाडीच्या अभिनेत्रीही गतवर्षी विवाहबंधनात अडकल्या. यावर्षीदेखील हा लग्नाचा सिलसिला असाच चालू राहील असं चित्र काही सेलिब्रिटी कपल्सवरून दिसून येतंय. आज newswithchai.com सोबत आपण अशाच काही सेलिब्रिटी कपल्सबद्दल जाणून घेणार आहोत.

* रणबीर कपूर – आलिया भट : २०१८ या वर्षाची सुरुवातच ज्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेने सुरु झाली ते जोडपं म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट. ब्रम्हास्त्र या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी विशेषतः या चित्रपटाच्या इस्रायल व बल्गेरियातील शेड्युलदरम्यान रणबीर आणि आलिया बराच वेळ एकमेकांसोबत घालवताना दिसून आले आणि तेव्हापासूनच बी-टाऊन व प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या जवळकीची कुजबुज सुरु झाली. सुरुवातीला इतर बऱ्याच सेलिब्रिटींप्रमाणे दोघांनीही आपलं नातं नाकारलं. मात्र अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणबीर-आलियाची एकत्रित उपस्थिती, त्यानंतर आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा या सोहळ्यातील फोटो पोस्ट करणं या सर्व गोष्टींवरून त्यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं असल्याचं दिसून आलं. यानंतर जीक्यू इंडिया या मॅगझिनच्या जून महिन्याच्या कव्हर स्टोरीमध्ये रणबीरने सांगितले की,”सध्या हे सगळं खूपच नवीन आहे. मी आत्ताच याबद्दल काही बोलू इच्छित नाही. या नात्याला अजून थोडा वेळ देण्याची व त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.” येत्या जून महिन्यात या दोघांचा साखरपुडा व्हावा, अशी नितू सिंग यांची इच्छा आहे, परंतु ब्रम्हास्त्रच्या रिलीजनंतरच साखरपुडा करण्याचा विचार रणबीर -आलिया करत असल्याचं मध्यंतरी बोललं जात होतं. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं सांगण्यात येतं असलं तरी अद्याप त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या वेडिंगलिस्टमध्ये हे कपल असणार की नाही, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय.

* अर्जुन कपूर-मलायका अरोरा : गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची ‘खास’ मैत्री ही ‘टॉक ऑफ द टाऊन’ राहिलीये. २०१८ च्या ऑगस्ट महिन्यात फॅशन डिझायनर कुणाल रावलच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिया मिर्झा, करण जोहर, वरुण धवन, जान्हवी कपूर या सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केलं, मात्र या शोमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अर्जुन-मलायकाच्या एकत्रित उपस्थितीने. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मलायकाचा ४५ वा वाढदिवस मिलानमध्ये साजरा करून परतत असताना मुंबईमध्ये त्या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. या दोघांनी आपलं नातं लपवण्याचा बराच प्रयत्न केला असला तरी अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये त्यांच्या या मैत्रीबद्दलच सत्य उघडकीस आलं. या शोमध्ये आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलताना अर्जुनने सांगितलं की तो एका मुलीसोबत डेटिंग करत होता(?) व तिच्याशी (मलाईकाचं नाव न घेता) लग्न करण्याचाही त्याचा मानस होता. त्यानंतर या शोमध्ये आमिर खानसोबत मलायकाने जेव्हा हजेरी लावली तेव्हा मलायकाला गमतीने छेडताना करण जोहर ‘इशारों इशारों मे’ बरंच काही बोलून गेला. पूर्वी मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर पळणारे अर्जुन-मलायका सध्या मीडियाच्या समोर हातात हात घालून फिरतात. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही यावर्षी एप्रिलमध्ये ख्रिस्ती रिती-रिवाजांनुसार लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता हे कितपत खरं हे जाणून घेण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागेल.

* वरुण धवन-नताशा दलाल : अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण व फॅशन डिझायनर नताशा दलाल यांच्या लव्हस्टोरीची चर्चा गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये वरुणसोबत नताशाच्या उपस्थितीने फक्त प्रसारमाध्यमांचंच नाही तर वरुणच्या चाहत्यांचंही लक्ष वेधून घेतलं. वरुणने त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीही जास्त सांगितलं नसलं तरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘कॉफी विथ करण’ मध्ये त्याच्या व नताशाच्या नात्याबद्दल खुलासा करताना तो नताशाला डेट करत असून ते दोघे कपल असल्याचं सांगितलं व तेव्हापासून या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे आता यावर्षी वरुण-नताशाच्या लग्नाचा बार उडतो का, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

* अर्जुन रामपाल-गॅब्रिएला डेमेट्रिऍडेस : पूर्व पत्नी व मॉडेल मेहर जेसीयापासून विभक्त झाल्यानंतर अर्जुन रामपाल पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं दिसून येतंय. अर्जुनला अनेकदा दक्षिण आफ्रिकेची मॉडेल व ‘डेम बाय गॅब्रिएला’ ची संस्थापिका गॅब्रिएला डेमेट्रिऍडेससोबत डिनर डेटवर जाताना पापराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं आहे. अर्जुन व गॅब्रिएला रिलेशनशिपमध्ये असल्याचे अद्याप अधिकृतपणे समजू शकलेलं नसलं तरी अर्जुनने व्हॅलेंटाईन डेला इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या त्याच्या गॅब्रिएलासोबतच्या फोटोवरून बरंच काही समजतंय. गॅब्रिएला प्रिया कुमार यांच्या ‘आय विल गो विथ यु-इन गुलमर्ग’ या पुस्तकावर आधारित वेबसीरिजमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनने गॅब्रिएलाचा या वेबसीरिजच्या सेटवरचा एक फोटो शेयर करत ‘एंडलेस लव्ह’ असं कॅप्शनही दिलं होतं.

* राजकुमार राव-पत्रलेखा पॉल : असं म्हणतात की, प्रेमात पडणं खूप सोपं मात्र ते निभावणं तितकंच कठीण आणि त्यातही बॉलिवूडसारख्या मायावी विश्वात तर प्रेम दीर्घकाळ टिकवणं हे एक प्रकारचं आवाहनचं. मात्र याच क्षेत्रातल्या काही सेलिब्रिटी कपल्सने आपलं रिलेशनशिप दीर्घकाळ यशस्वीपणे टिकवून ठेवलं आहे आणि यामधलंच एक कपल म्हणजे राजकुमार राव आणि पत्रलेखा पॉल. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिटीलाईट’ या थ्रिलर सिनेमात या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या दोघांनी आपलं रिलेशनशिप कधीही लपवलं नाही. आता गेल्या सात वर्षांपासून प्रेमात असलेलं हे जोडपं यावर्षी बोहल्यावर चढणार का? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलाय.

* फरहान अख्तर – शिबानी दांडेकर : अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतचं तथाकथित प्रेमप्रकरण व ब्रेकअपनंतर फरहान अख्तरच्या आयुष्यात एंट्री झाली ती मॉडेल, अभिनेत्री आणि अँकर असलेल्या शिबानी दांडेकरची. सप्टेंबर २०१८ मध्ये शिबानीने तिचा फरहानसोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. त्यात ती आणि फरहान एकमेकांच्या हातात हात गुंफून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्या फोटोवरूनच हे दोघे ‘जस्ट फ्रेंड्स’ नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. तेव्हापासून आत्तापर्यंत दोघेही आपापल्या सोशल मीडियावरून एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शनला फरहान आणि शिबानीच्या एकत्रित उपस्थितीने तर त्यांच्यातल्या प्रेमळ नात्याची सगळ्यांनाच खात्री पटली. काही दिवसांपूर्वी फरहानने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने आणि शिबानीने हातात रिंग घातल्याचा फोटो शेअर केला होता. एका वेब शोमध्ये फरहानच्या इंटरव्यूदरम्यानच्या त्याच्या काही विधानांवरून तो आणि शिबानी येत्या एप्रिल, मे महिन्यात लग्न करणार असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती फक्त या दोघांच्या लग्नाची!

* रिचा चड्डा-अली फजल :  रिचा चड्डा आणि अली फजल या दोघांच्या अफेयरविषयीची चर्चा सुरु झाली ती ७४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान. या महोत्सवात अली फजलच्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या सिनेमाच्या प्रीमियमवेळी रिचा आणि अली यांनी एकत्रच हजेरी लावली आणि तेव्हापासूनच त्यांच्या या मैत्रीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर अनेक वेळा हे दोघे एकत्रित दिसून आले. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली  नसली तरी त्यांचे चाहते मात्र या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये रिचाच्या ३२ व्या वाढदिवसानिमित्ताने तिने इंस्टाग्रामवर अलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला व त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये रिचाने म्हटले की,”आम्ही मालदीवमध्ये एका बेटावर फिरायला गेलो होतो. मला वाटत होतं की आता कोणत्याच गोष्टीने मी जास्त सरप्राईज्ड होऊ शकणार नाही किंवा काही गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकल्या नाहीत…थँक यु,अली फजल… ही खूप खास गोष्ट आहे जी आत्तापर्यंत कोणीतरी माझ्यासाठी केली (अर्थातच दुसरे म्हणजे माझे आई-वडील ज्यांनी मला हे आयष्य दिलं). धन्यता, आनंददायी, सुंदर!” रिचाची ही पोस्ट बरंच काही सांगून जात असली तरी त्यांच्यात नक्की काय चाललंय हे समजण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल असं दिसतंय. 

* फ्रिडा पिंटो-कॉरी ट्रॅन – ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ऑस्करविजेत्या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो लॉस अँजेल्समधील फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. एका अहवालानुसार, ट्रॅनने फ्रिडाला आधीच लग्नासाठी प्रपोज केलेलं आहे आणि ते दोघेही यावर्षी लग्नगाठीत अडकणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघेही आग्रा येथे सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते.