सध्या संपूर्ण देशात निवडणुकीची धामधूम सुरु आहे. नुकतीच पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रियाही पार पडली. बऱ्याच ठिकाणी निवडणुकीचा प्रचारही जोरदार सुरु आहे. आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतायेत. त्यातीलच एक म्हणजे कलाकारांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार करणे. काही बॉलिवूडचे कलाकार या राजकीय प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी झाले असले तरी काही असेही आहेत जे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार –

* अक्षय कुमार – बॉलिवूडमध्ये आतापर्यंत रुस्तम, एयरलिफ्ट, बेबी, गब्बर इज बॅक, पॅडमॅन अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दमदार अभिनय साकारणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला असला तरी त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे. म्हणजेच अक्षयचे वास्तव्य भारतात असले तरी त्याचे नागरिकत्व मात्र कॅनडाचे आहे. त्यामुळे अक्षय कुमार भारतातील मतदानप्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही.

* आलिया भट – अगदी कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारी व सध्याची तरुणाईची लाडकी स्टार आलिया भटदेखील या निवडणुकीत मतदान करू शकत नाही. आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान या ब्रिटिश नागरिक आहेत आणि आलियाकडेही ब्रिटिश पासपोर्ट आहे.

* दीपिका पदुकोण – बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमधला. त्यामुळे दीपिकाकडे डेन्मार्कचा पासपोर्ट आहे म्हणजेच तिचे नागरिकत्व हे डेन्मार्कचे आहे. म्हणूनच दीपिकादेखील भारतातील कोणत्याही निवडणुकीत मतदान करू शकत नाही.

* इम्रान खान – जाने तू या जाने ना, मेरे ब्रदर की दुल्हन, आय हेट लव्हस्टोरीज, कट्टी बट्टी या सिनेमांमधून झळकलेला अभिनेता आणि सुपरस्टार आमिर खानचा भाचा इम्रान खान हा सिनेमांसोबतच बॉलिवूडच्या इतर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. इम्रानचा जन्म अमेरिकेतला असून त्याचे नागरिकत्वही अमेरिकेचेच आहे. त्यामुळे इम्रान भारतात मतदान करू शकत नाही.

* कॅटरिना कैफ – हिंदी सिनेसृष्टीतील सौंदर्यवती आणि लाखो दिलों की धडकन असलेली कॅटरिना कैफ ही बऱ्याच वर्षांपासून भारतात राहत असली तरी ती मतदान करू शकत नाही. याचे कारण म्हणजे कॅटरिनाकडे अजूनही यूकेचा पासपोर्ट आहे म्हणजेच ती इंग्रज नागरिक आहे.

* जॅकलिन फर्नांडिस – २००६ साली मिस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी श्रीलंकन सुंदरी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे जन्मस्थळ बेहरिन हे आहे. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियन वंशाची आहे. जॅकलिन बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असली तरी अजूनही तिचे नागरिकत्व हे श्रीलंकेचे आहे. त्यामुळे तीदेखील या मतदानप्रक्रियेत सामील होऊ शकत नाही.

* सनी लिओनी – भारतात जन्मलेली करणजीत कौर म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनीकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. त्यामुळे तिचे नागरिकत्वही कॅनडाचे आहे. भारतीय नियमांनुसार मतदान करण्यासाठी भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक असते. ते नसल्याने सनी लिओनीदेखील भारतातील निवडणुकांत मतदान करण्यास पात्र ठरत नाही.