जिल्ह्यात बदलापूरचे नाव सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर म्हणून घेतले जावे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे प्रतिपादन.

आपले शहर हे सांस्कृतिकदृष्ट्या आघाडीचे शहर व्हावे अशी प्रबळ इच्छा असणे महत्वाची आहे आणि ती इच्छा बाळगणारे बदलापूरकर येथे आहेत. अशा हिऱ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना आपले कलागुण सादर करून देण्यासाठी “आमदार पुरस्कार” हे अत्यंत चांगले व्यासपीठ बदलापूरकरांना उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास बदलापूरकरांनी गर्दी केली होती. यावेळी अभिनेते शशांक केतकर, तहसीलदार जयराज देशमुख,मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, माजी नगराध्यक्ष राम पातकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजक किरण भोईर व अमित भोईर यांनी स्वागत तर भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. ‘माणूस’ म्हणून संबंध ठेवणे अतिशय आवश्यक आहे आणि तसे संबंध आमदार किसन कथोरे हे सर्वांशी ठेवत असतात असे जिल्हाधिकारी आपल्या भाषणात म्हणाले.

दादर, गिरगाव, डोबिवली नंतर बदलापूरला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जात आहे. या शहरात विविधता दिसून येते असेही ते म्हणाले. आजच्या सत्कार मूर्ती आणि संस्था याच या शहराला सांस्कृतिक आणि सक्षम शहर करणारे आहेत असेही त्यांनी सांगितले. मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात चांगल्या सांस्कृतिक गुणांचे विकेंद्रीकरण करणारे बदलापूर हे शहर आहे. बदलापूर शहर हे सुसंकृत शहर करण्याची प्रबळ इच्छा बाळगणारे या शहरात आहेत हे महत्वाचे आहे. कबुतराला गरुडाचे पंख लावले तरी तो गरुड भरारी घेऊ शकत नाही, गरुड भरारी घेण्यासाठी गरुडाची भरारी मारण्याची प्रबळ इच्छा मनात असावी लागते आणि ती इच्छा बदलापूरकरांमध्ये पहावयास मिळत असल्याचेही राजेश नार्वेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. ठाण्याची दळणवळणाची कनेक्टिव्हिटी शरीराची, खरा आत्मा हा सामाजिक,सांस्कृतिक कार्यात आहे आणि हे कार्य करणारे या शहरात आहेत असेही त्यांनी सांगितले.

शहरात उद्याने असावीत

ग्रंथसखा सारख्या चांगल्या संस्था बदलापूर शहरातअनेक उपक्रम राबवित असतात. ठाण्यातील आपला एक आर्किटेक्ट मित्र पुण्याला स्थलांतरित झाला त्याचे कारण जेव्हा विचारले त्यावेळी त्याने सांगितलेले कारण हे खरेच धक्कादायक असल्याचे राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाण्यात उद्यान कमी मॉल जास्त असल्याने मुलांना खेळायला उद्यान नाही पुण्यात उद्यान असल्याने पुण्यात शिफ्ट झाल्याचे सांगितल्यावर आपणास धक्का बसल्याचे नार्वेकर म्हणाले. शहरात उद्यान नसल्याने स्थलांतरित व्हावे लागणे खेदाची बाब असल्याचेही ते म्हणाले. बदलापूर शहरात ही उणीव भासू नये म्हणून आमदार किसन कथोरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आपण तात्काळ मंजुरी दिली आहे. या शहरात असंख्य हिरे असल्याचे या सत्कार सोहळ्याने दाखवून दिले आहे. अशा हिऱ्यांना समाजापुढे आणून त्यांचे कौतुक करतानाच त्या हिऱ्यांना आपले कला गुण सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ आज “आमदार पुरस्कार” हे नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल आमदार किसन कथोरे, नगरसेवक किरण भोईर व अमित भोईर यांचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खास कौतुक केले.

स्वतंत्र महापालिका असावी

या शहरात सर्व क्षेत्रातील चांगली माणसं असल्याने बदलापूर शहराची स्वतंत्र महापालिका असावी अशी सुशिक्षित नागरिकांची मागणी आहे आणि आपलाही तसा प्रयत्न असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 103 कोटींचे विशेष पॅकेज मंजूर केले असल्याची माहीतीही त्यांनी यावेळी दिली. 150 कोटी रुपये नवीन उड्डाण पूल निर्माण करण्यासाठी मंजूर केले आहेत त्याच प्रमाणे होम प्लॅटफॉर्म ला मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.