लोकसभेचे निकाल लागले. यात राजन विचारे यांनी आपला विजयी शिरस्ता कायम राखला. मुख्य म्हणजे २०१४ साली असलेल्या मोदी लाटेपेक्षा जास्त मते व मतांची आघाडी विचारे यांना प्रत्येक मतदारसंघातून मिळाली. नवी मुंबईतून देखील मतांची आघाडी यंदा दुप्पट झालेली पहायला मिळाली. मिळालेली मते ही उत्स्फूर्तपणे मोदींकडे बघून मिळाली असली. तरी खा. विचारे यांनी आपल्या कामांच्या जोरावर मते मागण्याचा प्रयत्न केला होता. तो काही प्रमाणात यशस्वी झाला होता.मात्र यात जमेची बाब म्हणजे युतीतील भाजपच्या शिलेदारांनी झोकून देऊन केलेला प्रचार विचारेंच्या कामी आला. त्यामुळे मतांची आघाडी दुप्पट झाली. नवी मुंबईतील दोन्ही विधान सभेचा मतदारसंघात सध्या सेना व भाजपला साजेसे वातावरण असून ते टीकवण्याचे कौशल्य मात्र विधानसभेच्या दृष्टीने युतीतील नेत्यांना करावे लागणार आहे.त्यामुळे मतांची आघाडी टीकवण्याचे आव्हान युतीसमोर ठाकले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वारस्यामुळे नवी मुंबईत कधी नव्हे ते भाजपला चांगले दिवस आले आहेत. शिवसेनेच्या तोडीस तोड पक्षाला नेऊन ठेवण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत. विधानसभेत एकत्र बसल्यावरही सेना व भाजपमधील धुसफूस सुरूच होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर दिसून येत होता. नवी मुंबईत देखील आरोप प्रत्यारोप सुरूच होते.मात्र केंद्रात हातमिळवणी झाल्यामुळे स्थानिक पातळीवर मात्र नाईलाजाने जुळवून घ्यावे लागले. त्याचा परिणाम नवी मुंबतील मतांच्या आघाडीत दिसून आला. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. केंद्रातील निवडणुकांत व स्थानिक पातळीवरील निवडणुकांत बराच फरक असतो. नवी मुंबईतील निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर अवलंबून असणार आहे.जनतेची नस ओळखण्यात व दुसऱ्या पक्षांतील नराजांना आपलेसे करण्यात नाईक वाकबगार आहेत. त्यामुळे युतीपुढे गणेश नाईकांचे तगडे आव्हान उभे आहे. ऐरोली विधानसभेत शिवसेनेला आपले अंतर्गत कलह लोकसभा निवडणुकीसारखे बाजूला सारून निवडणूक लढवावी लागणार आहे.

तर बेलापूरमध्ये कामांच्या जोरावर युतीला मते मागावी लागणार आहेत. त्यात आ.मंदा म्हात्रे यांच्या कामांमुळे त्या वरचढ ठरत असताना झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळाचे अध्यक्ष विजय नाहटा यांच्या फाउंडेशनतर्फे सुरू असलेले कार्यक्रम युतीला बळकटी देणारे ठरणार आहेत. आ.संदीप नाईक यांनी ऐरोली विधानसभेत सोसायट्या पिंजून काढण्यास, निवेदने देण्यास सुरुवात करून युतीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र बेलापूर विधानसभा क्षेत्रात माजी मंत्र्यांकडून अद्याप निवडणुकांच्या दृष्टीने कोणतीही पाऊले उचलली नसल्याची चर्चा आहे. त्यांची मदार ही सर्वस्वी पालिकेतील कामांवर असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेसला देखील आपले अस्तित्व जपण्यासाठी अंतर्गत कलहांवर मात करावी लागणार आहे.

सध्या प्रशासन व सत्ताधारी हा वाद गाजत आहे. शांत स्वभावाच्या आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राजकारणात व पालिकेत दोन्हीकडून कोंडी होऊ लागली आहे. नवी मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या नवमतदारांपर्यंत युतीचे नेते आपल्या कामातून पोहोचत आहेत. गणेश नाईकांना मात्र या मतदारांपर्यंत पोहोचण्यात अद्याप यश आलेले नाही हे युतीला लोकसभेतील मिळालेल्या मतांच्या आघाडीवरून दिसून आले आहे. त्यामुळे मतांची आघाडी कमी करून विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला ढोर मेहनत घ्यावी लागणार आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेविरोधात घेतलेली मतांची आघाडी नवी मुंबईत युतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीचा पाय खोलात असताना युतीपुढे आपले पक्षांतर्गत कलह दूर करून व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मतांची आघाडी कायम ठेवण्याचे आवाहन आहे.

आपल्या विश्वासू नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून गणेश नाईकांना तुम्ही मंत्री व्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत असा पक्षांतर करण्याचा सूचक सल्ला दिला गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधकांशी लढताना गणेश नाईकांना स्वपक्षीय नगरसेवकांची चिंता भेडसावत आहे.