मकरसंक्रांत हा सण जवळ आला की सगळ्यांना वेध लागतात ते पतंगोत्सवाचे. संक्रांतीच्या खूप दिवस आधीपासूनच आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी दिसू लागते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याची आवड असल्याने बऱ्याच शहरांत संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व नागरिक हे मरण पावल्याच्या व जखमी झाल्याच्या बऱ्याच घटना दरवर्षी महाराष्ट्रात घडतात. हे टाळण्यासाठी नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असूनही ठाण्यात नायलॉन मांजाची सर्रासपणे खरेदी-विक्री सुरू असून पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणांचे यांकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मकरसंक्रांतीला पतंग उडवण्यासोबतच पतंग काटाकाटीला लहान मुलांकडून अधिक पसंती दिली जाते. मात्र यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या  मांजामध्ये अनेकदा पक्षी अडकतात, तडफडतात व जखमी होऊन मरण पावतात. फक्त पक्षीच नाही तर मुके प्राणी व रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिकही नायलॉनच्या मांजामुळे गंभीर इजा होऊन जखमी होण्याचे प्रकार घडतात. अनेकदा पतंग कटल्यावर तो कुठेही पडून जातो व तुटलेला मांजा लटकत राहतो. अशा लटकणाऱ्या मांजामुळे वाहनचालक जखमी होऊन अपघात होतात. काहींना तर आपला जीवही गमवावा लागतो. हे सर्व अनुचित प्रकार टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली असून त्याविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हा आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात नायलॉनच्या मांजाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याबद्दल एका दुकानदाकडे विचारणा केली असता, त्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, “सध्या नायलॉन मांजाला अधिक मागणी आहे. नायलॉन सोबतच सुती मांजाही विक्रीस असला तरी त्याचे खरेदी-विक्रीचे प्रमाण नायलॉन  मांजाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. ठाण्यात जवळपास सर्वच दुकानांमध्ये नायलॉनचे मांजे विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच आम्हांला नायलॉन मांजावरील बंदी अथवा कारवाईची सूचना अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही किंवा तशी कारवाई अजून तरी कुठेही झालेली नाही.” संक्रांतीनिमित्त नायलॉन तसेच इतर भारतीय व चिनी बनावटीच्या मांजांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी-विक्री म्हणजे ठाण्यातील पक्षी, मुके प्राणी व नागरिक यांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच सुरू आहे. यांकडे ठाणे पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस यंत्रणा यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे .