१५ मे नंतर खोदकाम केल्यास फौजदारी गुन्हा

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच १५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या. तसेच ३१ मे पर्यंत नालेसफाई व रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश देखील संबंधित सर्व विभागांना दिले, त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. 

नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे सर्व जिल्हास्तरीय शासकीय संस्थांच्या प्रतिनिधीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुकत (२) समीर उन्हाळे, वाहतूक पोलीस कार्यालय, आरटीओ, महावितरण, एमटीएनएल, महानगर गॅस इ.स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शहरात १५ मे नंतर रस्त्यावर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामे सुरू आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. शहरातील प्रभागसमितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करून सी १ व सी २ इमारती खाली करण्याचे तसेच ज्या भागात दरड कोसळयाचा संभव आहे अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना देखील स्थलांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.

पावसाळ्यात महावितरण, पालिकेचा विद्युत विभाग यांनी संयुक्तपणे काम करतानाच ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ चेंबरची झाकणे बसविणे, चर बुजविणे व खड्डे बुजविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभागसमितीनिहाय १ जेसीबी मशीन व १ पोकलेन मशीन पुरविण्यात यावे. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रीत करून ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच उद्यान विभागाने वृक्षफांद्या छाटणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देतानाच छाटलेल्या फांद्या त्वरीत उचलण्याची कार्यवाही करावी असे सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रे या ठिकाणी आवश्यक तो औषधसाठा करावा व प्रतिबंधात्मक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन २४ तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी तसेच अग्निशमन विभागाने देखील याबाबत सतर्क राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांनी वाहतूक पोलीस विभाग, महानगर गॅस, महावितरण, रेल्वे तसेच जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपापसामध्ये समन्वय साधून आपत्तीचा सामना करण्याचे आवाहन केले.

फोटो ओळ – पावसाळ्यामध्ये आपत्ती निवारणासाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीकोनातून विविध शासकीय अधिका-यांच्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सोबत अतिरिकत आयुक्त (१) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुकत (२) समीर उन्हाळे.