मा.जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन

– NWC प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतीमान व कार्यक्षम करणे तसेच ग्रामीण जनतेस दिल्या जाणा-या सेवा अधिक प्रभावी,किफायतीशीररित्या उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज ओळखत ठाणे जिल्हा परिषदेने www.zpthane.maharashtra.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ विकसित केले आहे. आज जिल्हा परिषद सर्व साधारण सभेत अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी आरोग्य व बांधकाम समिती सभापती सुरेश(बाळ्या मामा ) म्हात्रे, महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे, समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती उज्वला गुळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी  ( सा) चंद्रकांत पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर तसेच सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
* योजनांची माहिती मिळवणे झाले सोयीचे
जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतीमान करुन ग्रामीण भागातील जनतेच्या व गरजू लाभार्थिंकरीता राबविण्यात येणा-या योजनांचा प्रसार व प्रचार करण्याकरिता आवश्यक माहिती या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे . याचा उपयोग लाभार्थिंना योजनेचा उद्देश,पात्रता, मंजुर निधी, लाभ मिळवणेकरीता अर्ज नमुने, अर्जाची सद्यस्थिती यांबाबतची माहिती जनतेस नविन संकेतस्थळाच्या साहाय्याने विनाखर्चात प्राप्त होणे शक्य होणार आहे.
* जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर
संकेतस्थळावर डिजिटल जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, विषय समित्यांची रचना व सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य यांची गट व गणनिहाय पत्ते,संपर्क क्रमांक हे छायाचित्रासह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
* नागरिकांना करता येणार ऑनलाईन तक्रारी
ग्रामीण भागातील अडचणी, समस्या, तक्रारी यांचे निराकरण करण्याकरिता जिल्हा परिषद नेहमी आग्रही राहिले असून ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने थेट व विनाखर्चात जिल्हा परिषदेच्या दरबारी मांडणेकरीता नविन संकेतस्थळावर सुविधा पुरविण्यात आली आहे.
* दैनंदिन माहिती अद्ययावत  होणार 
संकेतस्थळाद्वारे जिल्हा परिषदेचे विविध विभाग व त्यांची रचना, उद्देश,नागरीकांची सनद, आस्थापना विषयक कामकाज, माहिती अधिकार अंतर्गत येणा-या बाबी, कर्मचारींच्या सेवा विषयक बाबी, अनुकंपाविषयक बाबी, वार्षिक प्रशासन अहवाल, विभागनिहाय खातेप्रमुखांची कार्ये, कार्यासननिहाय कामकाजाचे वाटप, सर्व कार्यालय प्रमुख यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण याची माहिती प्राप्त होणे सहज शक्य होणार आहे, तसेच याबाबतची सर्व माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर संबंधित विभागांकडुन अपडेट केली जाणार आहे. हे संकेतस्थळ पेस इन्फोटेक संस्थेने विकसित केले असून यासाठी विस्तार अधिकारी वैभव वायकर, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी अर्पिता वैद्य, तंत्रज्ञान  सहाय्यक अलोक मिश्राम , जिल्हा परिषद माहिती व तंत्रज्ञान सहाय्यक शुभांगी देसाई यांनी विशेष मेहनत घेतली.