जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने देशातील सार्वजनिक परिवहन सेवेच्या इतिहासात सावित्रीच्या लेकीच्या हाती बसचे स्टेअरिंग देऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत नव्या पर्वाची सुरूवात केली आहे. उपक्रमाच्या ताफ्यात सामील झालेल्या 10 खास महिला तेजस्विनी बसेसचा शुभारंभ वाशी बस स्थानक येथे झाला. तसेच  NMMT च्या बेलापूर भवन आठवा मजला येथील आय.टी.एम.एस. (ITMS- Intelligent Transport Management System) प्रकल्पातील मोबाईल ई-तिकीट व बहुउद्देशीय नवी स्मार्ट कार्ड या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. आय.टी.एम.एस. (ITMS) माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, बहुउद्देशीय नवी स्मार्ट कार्डचे अनावरण आणि मोबाईल ई-तिकीट व मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कॅशलेस पध्दतीचा अवलंब करत प्रवाशांसाठी “नवी स्मार्ट कार्ड” नामक योजना एच.डी.एफ.सी. बँक, एन.पी.सी.आय. व रिडलर या संस्था आणि परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित करण्यात आली आहे. अशाप्रकारे देशात प्रवाशांना वाहतुकीसाठी ओपन लूप नवी स्मार्ट कार्ड बहुउद्देशीय ‘नवी स्मार्ट कार्ड’ उपलब्ध करून देणारी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम ही एकमेव सार्वजनिक संस्था आहे.

या ‘नवी स्मार्ट कार्ड ‘ योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

1) ‘नवी स्मार्ट कार्ड’ धारकांस स्मार्ट कार्डचा वापर बस तिकीट व पाससाठी करता येईल.

2) ‘नवी स्मार्ट कार्ड’ भारतात कोठेही चालेल. उदा: दुकानातील खरेदी तसेच ए.टी.एम. मधील व्यवहारासाठी याचा वापर करता येईल.

3) सदरचे ‘नवी स्मार्ट कार्ड’ ए.टी.एम. कम डेबिट कार्ड स्वरूपाचे असल्याने सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारासाठी वापरता येईल. उदा: खरेदी, देयक कर भरणा, सिनेमागृह, वाहतूकसाठी (बस, रेल्वे व विमान सेवा), मोबाईल रिचार्ज, डी.टी.एच. सेवा इ.

4) या ‘नवी स्मार्ट कार्ड’ मध्ये आपल्या वैयक्तिक रक्कमेच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी आहे.

5) या ‘नवी स्मार्ट कार्ड’ व्दारे होणाऱ्या सर्व व्यवहारांची माहिती संबंधितास एस.एम.एस. अलर्ट (SMS Alert) व्दारे त्वरित उपलब्ध होईल.

प्रवाशांना बहूउद्देशीय ‘नवी स्मार्ट कार्ड’ व  मोबाईल ई-तिकीट व पासची (सर्वसाधारण व विद्यार्थी ) सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सदरची योजना सर्व वातानुकूलित मार्गाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध करण्यात येत असून त्यानंतर टप्प्या टप्प्याने इतर सर्वसाधारण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांच्या बहुमूल्य वेळेत बचत होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (Integrated Intelligent Transport Management System) IITMS अत्याधुनिक प्रकल्प विकसित केला आहे. त्याचाच भाग म्हणून सीबीडी, बेलापूर येथील मुख्यालयात सुसज्ज मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (Command & Control Center) स्थापन केला असून जीपीएसव्दारे उपक्रमाच्या 458 बसेस, तुर्भे, आसुडगांव व घणसोली आगार तसेच 14 नियंत्रण कक्ष या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास थेट जोडण्यात आले आहेत.

याव्दारे दैनंदिनरित्या उपक्रमाच्या रस्त्यावर धावणाऱ्या बसेस तसेच चालक, वाहक यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे शक्य आहे. आयआयटीएमएस या प्रगत प्रणालीचा मुख्य उद्देश प्राप्त माहिती विश्लेषणाचे आधारे वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करणे तसेच प्रवासीभिमुख वक्तशीर व विश्वासार्ह सेवा प्रदान करणे हा आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्याच्या मुख्य उद्देशाने तसेच प्रवाशांना उपक्रमाच्या कार्यान्वित सर्व मार्गावरील वातानुकूलित व सर्वसाधारण बसेसच्या अचूक वेळेची माहिती एन.एम.एम.टी. बस ट्रॅकर (NMMT Bus Tracker) या स्वतंत्र मोबाईल ॲपव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. उपक्रमाच्या 458 बसेस जीपीएसव्दारे जोडून प्रत्येक बसच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती, बस येण्या-जाण्याच्या वेळा, मोबाईल ॲपमध्ये बस ट्रॅक करणे तसेच आपण कोणत्या बसमध्ये प्रवास करत आहोत याचा संदेश ॲपव्दारे नातेवाईकांना देता येतो. सद्यस्थितीत 50 हजारपेक्षा अधिक प्रवाशी मोबाईल ॲप सेवेचा वापर करीत आहेत. महिलांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा याकरिता स्वतंत्र बस व्यवस्था होण्याकरिता राज्य शासनाने तेजस्विनी बस योजने अंतर्गत बस खरेदी करिता रू.2.50 कोटीचे अनुदान व JnNURM / AMRUT योजने अंतर्गत ITMS प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाने रू.4.00 कोटीचे एकत्रित अनुदान नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध  करून दिले असल्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी दिली.