थेट प्रचारापेक्षा सोशल मीडियावर तरुण कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा जोर

लोकसभेचे भले मोठे मतदार संघ पिंजून काढणाऱ्या उमेदवारांना सोशल मीडियाचाच आधार सध्या दिलासा देत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचे पडघम वाजताच प्रचाराला जोर चढला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात प्रचारास सुरुवात झालेली असली तारीही यात सर्वाधिक प्रचाराची जागा सोशल मीडियाने घेतलेली आहे. यात फेसबुक, व्हाट्सएपच्या व ट्विटर, वेबपोर्टलस, डिजिटल इमेजेस व संदेश, लहान लहान जी आय एफ, लहान व्हिडीओ, यु ट्यूब अशा एक ना अनेक सोशल मिडियांतील साधनांचा वापर करत प्रचाराच्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे  सोशल मीडियात वाद प्रतिवादाचे युद्ध रंगलेले दिसत आहे.

मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतस प्रचाराचा वेग व वाढू लागला आहे. कडक उन्हाळ्यात घाम गाळत उमेदवार प्रचार रॅली, मेळावे, सोसायट्या पिंजून काढत आहेत. मात्र  यात सर्वात पुढे आहे तो सोशल मीडियाचा जोर. सध्या फोर जीचा जमाना असला तरी प्रत्येकाकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहे. दिवसभरात विरंगुळा म्हणून स्मार्ट फोन आयुष्यात महत्वाची भूमिका बजावू लागला आहे. जणू काही  प्रत्येकाचा अविभाज्य अंग बनला आहे. त्यामुळे स्मार्ट फोन नसणारा मनुष्य विरळाच अशी स्थिती सध्या सर्वत्र आहे. त्याचा फायदा घेत शेवंटच्या मनुष्यापर्यंत पक्षांच्या भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने पोहीचवल्या जाऊ लागल्या आहेत. थेट प्रचार उमेदवारांकडून करताना त्यांच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्त्यांची गर्दी जमवली जात आहे. तर तरुण कार्यकर्त्यांनी मात्र उन्हाच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी सोशल मिडियावरून  प्रचारास सुरुवात केली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सएप व फेसबुकवर असलेले ग्रुप मध्ये प्रचाराचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे अशा अनेक ग्रुपवर पोस्ट टाकून सोशल मीडियाचे युद्ध पेटलेले दिसून येत आहे. तर व्हाट्सअप्प वर ब्रॉडकस्ट लिस्ट करून प्रत्येकाला वेगळा संदेश जाईल याची काळजी घेतली जात आहे.

विविध पक्षांकडून देशी विदेशी एजन्सीला काम देण्यात आलेले आहे. सोशल मिडियामुळे हमखास प्रत्येक माणसापर्यंत पोहोचता येत असल्याने त्यासाठी करोडो रुपये ओतले जात आहेत. तर विविध उमेदवारांकडून स्थानिक पातळीवर रूम तयार करण्यात आली आहे. यात १० ते १२ जणांची टीम ट्विटर व फेसबुकवर आपल्या उमेदवाराच्या बाजूने पोस्ट टाकून त्यावर कमेंट करून वातावरण निर्मिती केली जात आहे. तर विरोधी कमेंट्स आल्याकी त्यावर तुटून पडण्याचे व त्यास सडेतोड उत्तर देण्याचे काम या वॉर रूममधून केले जात आहे. आपल्या उमेदवाराची जमेची बाजू लोकांपर्यंत पोहोचवतानाच विरोधी पक्षाची उणी धुणी काढणाऱ्या पोस्ट देखील समाजमाध्यमांत पोहोचत आहेत. यात सर्वात महत्वाची भूमिका व्हाट्सएपच्या हे माध्यम बजावत आहे. लहान लहान व्हिडीओ, इमेजेस, जी आय एफचा पाऊस पडताना दिसत आहे. उमेदवारासोबतच त्यांच्या पक्षाच्या चुका असलेले व्हिडीओ क्लिप्स पाठवल्या जात आहेत. तर केंद्रीय किंवा राज्यस्तरावर एखादा आरोप केला तर ते आरोप खोदून काढणाऱ्या पोट व्हायरल होत आहेत. त्यात सर्वात जास्त जागा घेतली आहे ती इमेजेस व त्यावरील लहान लहान संदेश महत्वाची भूमिका बजावत आहेत. थेट प्रचारापेक्षा लघु संदेशानी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात थेट प्रचारापेक्षा सोशल मीडियावर तरुण कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा जोर चढलेला पाहायला मिळत आहे.