महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, मंदिरे ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसोबतच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. यावर्षी १३ एप्रिल रोजी पनवेलमधील प्रसिद्ध श्री भगवती साई संस्थान संचालित साईबाबा मंदिरात विधवा आणि निराधार महिलांना अन्न, धान्य आणि संपूर्ण महिनाभराचे राशन मोफत वाटपाचा कार्यक्रम पार पडला. श्री भगवती साई संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ जवळपास १४० महिलांनी घेतला. या ट्रस्टतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून हा अनोखा उपक्रम दर महिन्यातून एकदा आयोजित केला जातो. आज Newswithchai.com सोबत आपण याच साई संस्थान ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणार आहोत.   

अनेक महापुरुषांची जन्मभूमी त्यासोबतच प्रगल्भ इतिहास, प्राचीन संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती यांतील विविधतेमुळे आपला महाराष्ट्र फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरात सुप्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टींसोबतच महाराष्ट्रातील देवस्थानेदेखील जगभरातील धार्मिक मंडळींचे आकर्षणबिंदू आहेत. या देवस्थानांमधीलच एक म्हणजे शिर्डीचे साईबाबा मंदिर. साईबाबांना समाधी घेऊन १०० वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही त्यांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भक्तगण येत असतात. साईबाबा हयात असताना व त्यांच्यानंतर दासगणूंनी साईबाबांच्या उपदेश प्रचाराचे कार्य आयुष्यभर सुरु ठेवले. त्यापुढील कालखंडात अनेक साई भक्तांनी हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम केले आणि त्यातीलच एक म्हणजे साईसेवक श्री साई नारायणबाबा. 

२० फेब्रुवारी १९३६ रोजी मुंबईमधील खार येथे जन्मलेल्या श्री साई नारायणबाबांनी वयाच्या २२ व्या वर्षापासून साईबाबांच्या कार्याचे आणि त्यांच्या उपदेश प्रचाराचे कार्य हाती घेतले. नारायणबाबा हे गेल्या ६० वर्षांपासून सातत्याने हे कार्य करीत असून त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले आहे. हे कार्य करीत असतानाच त्यांनी १९६४ साली कुर्ला येथे पहिल्या साईबाबा मंदिराची उभारणी केली. दिवसेंदिवस भक्तांची वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन नारायणबाबांनी १ जानेवारी १९८३ रोजी पनवेल येथे श्री भगवती साई संस्थानची स्थापना केली. या संस्थानांतर्गतच येथे भक्तांसाठी एक भव्य साई मंदिरही उभारण्यात आले. पनवेलमधील हेच साईबाबा मंदिर आज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासोबतच श्री साई नारायणबाबांचा अधिक कल असतो तो सामाजिक कार्याकडे. समाजातील तळागाळातील घटक, गोरगरीब, गरजू, अपंग व्यक्ती यांची सर्वांगाने उन्नती आणि विकास व्हावा, यासाठी नारायणबाबा यांनी श्री भगवती साई संस्थान ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. पाहुयात काय आहेत हे सामाजिक उपक्रम :-

* श्री भगवती साई संस्थान ट्रस्टच्या वतीने पनवेल शहरातील गरीब मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली आहे. या शाळेतील शिक्षण हे पूर्णपणे मोफत असून त्याकरता कुठलीही फी आकारली जात नाही. यासोबतच मुलांना शाळेचा गणवेश, दफ्तर, स्टेशनरी यांचे मोफत वाटप केले जाते. तसेच या मुलांना एक वेळचे दूध आणि नाश्ताही मोफत दिला जातो. सध्या जवळपास १०० मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत.

* ट्रस्टतर्फे आजूबाजूच्या परिसरातील गोर-गरीब मुलांसाठी दररोज सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता मोफत दूध आणि नाश्ता दिला जातो. रोज साधारण १५० मुले याचा लाभ घेतात.

* साई संस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना स्कुल युनिफॉर्म, वह्या, पुस्तके, दफ्तर यांचे मोफत वाटप केले जाते.

* गोर-गरीबांना उपयोगी वस्तू आणि अन्न-धान्याच्या वाटपासोबतच त्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्यविषयक सेवा मिळाव्यात, यासाठी साई संस्थान ट्रस्टतर्फे मोफत दवाखाना सुरु करण्यात आला आहे. हल्ली डॉक्टरांची फी ३०० ते ५०० रुपये झाली आहे, जी आर्थिक मिळकत कमी असलेल्या रुग्णांना अजिबात परवडत नाही. शिवाय, औषधांचा खर्चही वेगळा असतो. ट्रस्टने सुरु केलेल्या या मोफत दवाखान्यामुळे त्यांचा हा खर्च वाचतो.

* आजकालच्या युगात लग्न ही अतिशय खर्चिक बाब झाली आहे. हलाखीची परिस्थिती असलेल्या किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या मुलांच्या विवाहाचा खर्च करणे शक्य नसते. म्हणूनच श्री भगवती साई संस्थान ट्रस्टच्या वतीने अशा गरीब कुटुंबांतील तरुण-तरुणींसाठी सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले जाते. या विवाहसोहळ्यांना श्री साई नारायण बाबा स्वतः उपस्थित राहून नववधूंचे कन्यादान करतात. त्यांना आशिर्वादासोबत सोन्याचे मंगळसूत्रही दिले जाते. तसेच नवरदेवाला अंगठी, वधू-वर अशा दोघांना लग्नाचा पोशाख आणि श्री नारायणबाबांच्या हस्ते साधारण ५० ते ६० हजार रुपयांचे गृहोपयोगी सामान देण्यात येते.

* लोणावळा येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड (एन.ए.बी) या संस्थेतील अंध व्यक्तींना त्यांचे जीवन सुसह्य आणि आनंदी होण्यासाठी साई संस्थान ट्रस्टतर्फे सर्वतोपरी मदत केली जाते. सध्या या संस्थेत जवळपास ८० अंध व्यक्ती आहेत.

* साई संस्थान ट्रस्टतर्फे एक गो शाळा चालवण्यात येते. या गोशाळेतून निघणारे जवळपास ५० लिटर दूध हे फक्त आजूबाजूच्या परिसरातील गरीब मुले आणि हॉस्पिटलमधील रुग्णांना दिले जाते.

* याशिवाय ट्रस्टने पनवेलमधील लाईफ लाईन हॉस्पिटलला दोन डायलेसिस मशिन्स देणगीच्या स्वरूपात दिल्या आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांना इथे मोफत डायलेसिस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

* भारतात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. दरवर्षी २० फेब्रवारी रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्री साई नारायणबाबांच्या जन्मोत्सवानिमित्त गरजू शेतकऱ्यांना गाईंचे वाटप करण्यात येते. नारायणबाबांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पनवेलमधील गरजू शेतकऱ्यांना ७५ गाई देण्यात आल्या होत्या. तसेच ८ दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये गरीब गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरीब तरुण-तरुणींचा सामूहिक विवाह सोहळा तसेच लहान मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

काही प्रमुख सामाजिक उपक्रमांसोबतच अनेक समाजोपयोगी कार्यक्रमही संस्थेच्या वतीने आयोजित केले जातात. हे सर्व उपक्रम समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांतून राबवण्यात येतात. जनतेच्या कल्याणासोबतच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि विजेची बचत व्हावी, यासाठी श्री भगवती साई संस्थानने जून २०१७ साली ४० कि.वॅ. क्षमतेचा ऑनग्रीड सोलर पॉवर प्लांट उभारला आहे. या सोलर पॉवर प्लांटमधून दरमहा ६००० युनिट वीजनिर्मिती होत असते. या प्रकल्पाची उभारणी पनवेलमधील साई सोलर सर्व्हिसेसने केली आहे.

पनवेलमधील या साईबाबा मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये धार्मिक कार्यांसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्यावर जास्त भर दिला जातो. या सर्व सामाजिक कार्यांवरून ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोचि ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ हे संत तुकाराम महाराजांचे अभंग श्री साई नारायणबाबांना तंतोतंत लागू होते, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.