‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची राज्यातील 10 शहरांमध्ये निवड – सर्व स्तरांतून अभिनंदन :

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत स्पर्धात्मक पध्दतीने केल्या जाणा-या निवडीत राज्यातील 10 शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवड झाली असून आता आधुनिक शहर म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई शहर ‘ स्मार्ट सिटी’ कडे झेपावणार आहे.

स्मार्ट सिटी अभिनांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 लक्ष पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सहभागी शहरांतून स्पर्धात्मक पध्दतीने 10 शहरांची राज्य शासनामार्फत निवड करण्यात येऊन त्यांची शिफारस केंद्र शासनाकडे केली जाणार आहे. याकरीता राज्यातील 32 शहरांच्या प्रस्तावांचा राज्य शासनाने विचार केला. त्यापैकी निवडलेल्या 20 शहरांच्या स्मार्ट सिटी बाबतच्या संकल्पना व त्या पूर्ण करण्यासाठीच्या क्षमतांचा सादरीकरणाव्दारे साकल्याने विचार करण्यात आला व त्यामधून 10 शहरांची निवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी शासनाच्या निवड समितीसमोर प्रभावी सादरीकरण केले होते.

राज्यातून निवड झालेल्या 10 शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसह बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे – पिंपरी, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, कल्याण डोंबिवली या शहरांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी अभिनांतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाश्वत वीज पुरवठा, पर्यावरण जतन व संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेतून आरोग्यरक्षण, उत्तम प्रशासन व्यवस्थेच्या दृष्टीने ई-गव्हर्नन्स व नागरिकांचा सहभाग, आरोग्य संवर्धन, सुरक्षा विषयक माहिती व कार्यप्रणाली, गरिबांकरीता परवडणारी घरे, कार्यक्षम नागरी वाहतुक व सार्वजनिक परिवहन व्यवस्था, समाधानकारक पाणीपुरवठा अशा विविध बाबींचा गुणवत्ता विकास करावयाचा असून त्यादृष्टीने शहर सुधार, पुर्नविकास, हरितक्षेत्र विकास या मुख्य विकास घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल अशी माहिती आयुक्तांनी दिली.

पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा नागरी सुविधाविषयक अत्याधुनिक प्रकल्पांमुळे विविध स्तरावर नावाजली जाणारी नवी मुंबई महानगरपालिका अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झाली आहे. आता स्मार्ट सिटी अभियानांतर्गत झालेल्या या राज्यस्तरीय निवडीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून नवी मुंबई शहराचे स्थान स्मार्ट सिटीकरीता केंद्र शासनाच्या निवडीतही राहील असा विश्वास महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.