नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघ संपूर्ण भारतामध्ये आपला वेगळी ठसा उमटवत सातत्याने पंधरा वर्षे अग्रक्रमांकावर राहिलेला आहे. मध्यंतरीच्या काळात संघातील दोन सदस्य कमी झाल्याने खेळाडूंच्या कमतरतेमुळे स्पर्धा सहभागात अडचणी जाणवत होत्या. मात्र नुकतेच महापालिकेने खेळाडू दत्तक योजने अंतर्गत होतकरु व उदयोन्मुख खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने नवी मुंबई महानगरपालिका संघाने पुन्हा एकवार आपल्या दर्जेदार कामागिरीचे प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.

नुकत्याच 7 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मालेगांव, नाशिक संघावर मात करीत अजिंक्यपद पटकाविले.  32 संघांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत 21 गुणांच्या खेळामध्ये उपउपांत्य फेरीत नवी मुंबई महानगरपालिका संघाने नेहरुनगर, सांगली संघाला 21-8 गुणांनी पराभूत केले व नंतरच्या उपांत्यपूर्व फेरीत राजमाची, सातारा संघावर 21-6 गुणांनी मात केली. पुढच्या  उपांत्य फेरीत धरणगुत्ती, कोल्हापूर संघांला 21-7 गुणांनी पराभूत करत अंतीम फेरीत प्रवेश करत अंतीम 3 सेटमध्ये खेळवलेल्या स्पर्धेत मालेगांव,नाशिक संघास 15-13, 15-8 अशा सरळ दोन सेट मध्ये पराभूत करीत नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल संघाने अजिंक्यपदाला गवसणी घातली.

या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका संघातून शोहेब शेख, रणजित इंगळे यांनी अत्यंत प्रेक्षणीय असे खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली तसेच सुशांत पवार यांचा अभेद्य असा बचाव व सुनिल गायकवाड यांची उत्कृष्ट अशी सर्व्हिस रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरली. सुरज चौगुले व अक्षय पवार या जोडीने पंचींग व नेटींग करत प्रेक्षकांची मने जिंकून संघाला अजिंक्यपद मिळण्यास हातभार लावले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट डिफेन्सर म्हणून सुशांत पवार, सर्वोत्कृष्ट नेटमन म्हणून सुरज चौगुले व अक्षय पवार यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका शुटिंगबॉल  संघाचे अनुभवी प्रशिक्षक सखाराम खानदेशे यांचे मौलिक मार्गदर्शक खेळाडूंना लाभले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे यांनी महानगरपालिका शुटिंगबॉल खेळाडूंचे या उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले आहे.