नवीन गवते यांना भरला स्थायी समिती सभापती पदाचा अर्ज; तर शिवसेनेसाठी मात्र उरणार औपचारिकता

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी दिघ्यातील नगरसेवक नवीन गवते यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे अर्ज भरला. त्यांच्याच नावाची चर्चा नवी मुंबईत ऐकण्यास मिळत होती. त्यात नुकतेच लोकसभेचे निकाल हाती आले आहेत. त्यात युतीचे उमेदवार राजन विचारे यांना नवी मुंबईतून मिळालेली मतांची आघाडी धक्कादायक मानली जात आहे. त्यामुळेच की काय आधीच संकटात सापडलेल्या आ. संदीप नाईक आमदार असलेल्या ऐरोली मतदार संघात मतांच्या बेरजेचे राजकारण साधत नवीन गवते यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालण्यात आली आहे. २७ मे रोजी ही निवडणूक होणार असली तरी सदस्य ससंख्येच्या बळावर गवते यांचा विजय निश्चित मानला जात असून शिवसेनेसाठी मात्र औपचारिकता उरली आहे.

हवं लोकसभेत भाजप व सेनेच्या युतीला मिळालेली आघाडी म्हणजे गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे. विधानसभेचे गणित पाहता यंदाची ऐरोलीतील लढत संदीप नाईक यांना कठीण आहे. त्यात सध्या भाजपने ऐरोली मतदार संघात नेत्यांची फौज उभी केली आहे. त्यात आ. रमेश पाटील, कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले नरेंद्र पाटील व राज्यमंत्री दर्जा लाभलेले विजय चौगुले त्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नवी मुंबईला लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे बेलापूर मतदार संघापेक्षा ऐरोली मतदार संघात चुरस वाढलेली वआहे. त्यामुळे सध्या नाईकांची मदार ही स्वतःच्या नगरसेवकांवर आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या असताना ऐरोलीतील चक्रव्यूह भेदण्याची रणनीती नाईकांना आखावी लागत आहे. त्यामूळेच की काय नाराज सुरेश कुलकर्णी यांच्यानंतर नाराज नवीन गवते यांचे मन सांभाळले जाऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गवते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फाउंडर मेंबर असूनही त्यांना सतत डावलण्यात येत होते. मात्र त्यांच्याकडे असलेल्या तीन नगरसेवकांचा फायदा निवडणुकीत घेतला जात होता.मात्र पालिकेतील मुख्य पदांपासून मात्र त्यांना कायम लांब ठेवण्यात येत होते. त्यात यंदा त्यांना स्थायी समिती सदस्यपदी निवड करून खुश करण्याचा प्रयत्न केला गेला.मात्र सभापती पदापासून मात्र ते दूरच राहिले. मात्र यंदाची ऐरोलीची वाट संदीप नाईकांसाठी बिकट असताना व लोकसभेच्या निकालात ऐरोलीतून मिळालेला लीड ही धोक्याची घंटा ओळखून गणेश नाईकांनी वेळीच नवीन गवते यांच्या गळ्यात स्थायी सभापती पदाची माळ टाकून बेरजेचे राजकारण केले आहे. त्यामुळे एकाचवेळी आगरी कोळी समाजाची व दिघ्यातील झोपडपट्टी भागातील मतांचा फायदा संदीप नाईकांना होणार आहे.