महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या वृक्षारोपण या उपक्रमाचाच एक भाग म्हणून खारघरमधील शाश्वत फाउंडेशनने ‘शृंखला’ या सामाजिक संस्थेच्या सोबतीने सोमवारी १३ मे रोजी ‘सीड्बॉल ऍक्टिव्हिटी’ हा एक अनोखा उपक्रम राबवला. खारघरमधील भाजपच्या महिला आघाडी सरचिटणीस व शाश्वत फाउंडेशनच्या संस्थापिका बिना गोगरी यांच्या अध्यक्षतेखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमास विशेषतः लहान मुले व त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अतिशय डोंगराळ भाग, पठार, टेकडी किंवा ज्या ठिकाणी प्रत्यक्षपणे जाऊन वृक्षारोपण करणे शक्य नसते, अशा ठिकाणी झाडे लावण्यासाठी मातीपासून बनवलेले ‘सीड्बॉल्स’ हा एक उत्तम पर्याय ठरतो. ‘सीड्बॉल ऍक्टिव्हिटी’ या उपक्रमांतर्गत माती, खत आणि कीटकनाशके यांचे एक मिश्रण तयार करून त्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवले जातात व त्या प्रत्येक गोळ्यात कोणत्याही एका फळाचे बी टाकले जाते. त्यानंतर हे मातीचे गोळे उन्हामध्ये वाळवले जातात. ते गोळे सुकल्यानंतर जोपर्यंत ते कोणत्याही डोंगरावर अथवा पठारावर टाकले जात नाही तोपर्यंत त्यांना हवाबंद बरणीत ठेवले जाते. या मातीच्या गोळ्यांमध्ये कीटकनाशके असल्यामुळे ते खराब न होता दीर्घकाळ टिकतात. पावसाळा सुरु झाल्यानंतर डोंगर, पठार, टेकड्या अशा जागी हे सीड्बॉल्स टाकले जातात. यांमुळे दुर्गम भागांतही वृक्षांची लागवड करणे सोपे जाते.

शाश्वत फाउंडेशन आणि शृंखला या दोन संस्थांनी एकत्रितपणे ‘सीड्बॉल ऍक्टिव्हिटी’ ही मोहीम खासकरून लहान मुलांसाठी आयोजित केली होती. यामध्ये ५ ते १३ वर्षे या वयोगटातील जवळपास ५५ ते ६० लहान मुले सहभागी झाली होती. या मुलांना उपक्रमाच्या सुरुवातीला सीड्बॉल्स बनवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यामध्ये वापरण्यात आलेल्या फळांच्या बिया व त्यांचे उपयोग यांबद्दल माहिती देण्यात आली. या मोहिमेत बाहवा, रेन ट्री, जांभूळ, फणस, पपई, आवळा, बिलीपत्र अशा वेगवगळ्या प्रकारच्या फळांच्या बियांचा वापर सीड्बॉल्स बनवण्यासाठी करण्यात आला. खारघरमधील सेक्टर १९ येथील सिडको गार्डन येथे पार पडलेल्या या ऍक्टिव्हिटीमध्ये छोट्यांनी तब्बल १२०० सीड्बॉल्स बनवले. लहान मुलांसोबतच प्रशिक्षक व मार्गदर्शक असे सर्व मिळून एकूण ९० ते ९५ जण या उपक्रमात  सामील झाले होते. यावेळी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात स्मिता आचार्य, अस्मिता शर्मा, प्राची देशपांडे, इंदूमती निर्मल, निता गोगरी, रामेश्वरी, वैशाली प्रजापती, हंसा पारघी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

याशिवाय पनवेल महानगरपालिका प्रभाग अ समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, भाजपा रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष कीर्ती नवघरे, भाजपा खारघर उपाध्यक्ष दिलीप जाधव आणि भाजपा पनवेल शहर युवा मोर्चा चिटणीस परेश बोरसे यांनी या उपक्रमास भेट देत मुलांचा उत्साह वाढवला.

” बरीचशी उंच पठारे, डोंगर, दुर्गम पर्वतांवरील माती, हवामान वृक्षलागवडीसाठी अनुकूल असलं तरी प्रत्यक्षपणे तिथे जाऊन वृक्षारोपण करणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे अशा दुर्गम ठिकाणी झाडांच्या लागवडीसाठी सीड्बॉल्स अतिशय उपयुक्त ठरतात. हे सीड्बॉल्स पठारे व डोंगरांवर त्यांच्या पायथ्याशी उभे राहून  सहजपणे टाकता येतात. तसेच हे सीड्बॉल्स तुम्ही प्रवास करतानादेखील सोबत बाळगून रस्त्याच्या आजूबाजूला किंवा घाटांत टाकू शकता. मात्र हे करण्याआधी माती ओलसर असणे आवश्यक असते. म्हणूनच दोन-तीन वेळा पाऊस पडल्यानंतरच म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे सीड्बॉल्स पर्वत, डोंगरांवर टाकले जावेत. लहान मुलांना म्हणजेच आपल्या भावी पिढीला यांबद्दल संपूर्ण माहिती मिळावी व पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही ही सीड्बॉल ऍक्टिव्हिटी खास छोट्यांसाठी आयोजित केली होती. आपल्या महाराष्ट्रातील माती व हवामान यांचा एकूणच अंदाज घेऊन त्यामध्ये सहजपणे वाढतील व जगतील अशा झाडांची निवड आम्ही या ऍक्टिव्हिटीसाठी केली. यामध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांनी १२०० सीड्बॉल्स बनवले आणि आता हे सीड्बॉल्स त्या मुलांकडूनच टॉस केले जावेत, यासाठीही आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत.” – बिना गोगरी, संस्थापिका (शाश्वत फाउंडेशन)