-NWC प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिक हे शहराचा महत्वाचा अनुभवी घटक आहेत या भूमिकेतून ज्येष्ठांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून प्रियदर्शनी पीस पार्क मधील हे रिसॉर्टसारखे वाटणारे विरंगुळा केंद्र ज्येष्ठांच्या मनात आनंद निर्माण करणारे असेल असा विश्वास नवी मुंबईचे महापौर श्री.जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी सेक्टर 14 येथे महात्मा गांधी कॉम्प्लेक्स येथील प्रियदर्शनी पीस पार्क येथे बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र लोकार्पण समारंभप्रंसगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांचेसमवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, सभागृहनेता श्री, रविंद्र इथापे, क प्रभाग समिती अध्यक्ष श्री. शशिकांत राऊत, स्थानिक नगरसेवक श्री. प्रकाश मोरे, एपीएमसी चे माजी संचालक श्री. शंकर पिंगळे, माजी नगरसेविका श्रीम. शिल्पा मोरे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त श्री. दिवाकर समेळ, उप अभियंता श्री. संजय पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ऐरोली विधानसभा सदस्य श्री. संदीप नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या राज्य व राष्ट्रीय संमेलनातही नवी मुंबई महानगरपालिकेसारखे काम इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे अशी मागणी देशभरातील ज्येष्ठ नागरिक करतात हा आपल्या शहराचा बहुमान असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देणा-या या विरंगुळा केंद्रात मला आमदार निधी देता आला याचे समाधान वाटते अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.

स्थानिक नगरसेवक श्री. प्रकाश मोरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचा आनंद व्यक्त करीत प्रभागातील सर्व सुविधा कामांना गती मिळाल्याचे सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना मानसिक विरंगुळ्याचे व परस्पर संवादाचे ठिकाण म्हणून ज्येष्ठ नागरिक केंद्रे अत्यंत उपयुक्त सिध्द होत असून या केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणा-या सुविधा पुर्तीसाठी महानगरपालिका नेहमीच तत्पर राहिली आहे. प्रियदर्शनी पीस पार्क मधील हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र रु. 23 लक्ष सर्वसाधारण निधी व आमदार श्री. संदीप नाईक यांचा 4 लक्ष स्थानिक विकास आमदार निधी यामधून उभे राहिले असून येथेही इतर विरंगुळा केंद्रांप्रमाणेच फर्निचर व अनुषांगीक सुविधा उपलब्ध करण्यात येऊन विरंगुळा केंद्र कार्यान्वित होणार आहे.