नेरुळ से. १९ ए येथे न्यायालायच्या आदेशाने पूर्ण झालेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकमुळे नागरिक त्रासलेले आहेत. त्यात मुंबई,ठाण्याची वाहने परिवहन आयुक्तांच्या आदेशाने पासिंगसाठी येऊ लागल्याने वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. याबाबत नागरिकांतर्फे न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. मात्र कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेल्या या ट्रॅकमधून सुटका होण्यासाठी मात्र येथील नागरिकांना हातावर हात ठेवून वाट बघण्याखेरीज काहीही उरलेले नाही. त्यात नागरिकांचा विरोध ओसरल्यावर मात्र पालिकेने आखून दिलेल्या नियमांनुसार मात्र आरटीओचे कामकाज चालत नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे नागरिकांकडून मात्र निराशा व्यक्त केली जात आहे. पालिकेने आरटीओला काही अटी टाकून ते प्रतिज्ञापतकोर्टात दाखल केले आहे. त्या अटींनुसारच आरटीओचे कामकाज चालवावे अशा अटी पालिकेने टाकल्या होत्या.मात्र या अटींना छेद देत हे काम सुरू आहे. पालिकेने टाकलेल्या अटीत टेस्टिंग ट्रॅकच्या भुखंडालागत ३० मी, २० मी,१५ मी लांबीचा रस्ता आहे. या मार्गांवर वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेणे संबंधित विभागाने घेणे गरजेचे होते. मात्र ती दखल घेतली जात नसल्याने वाहने खुशाल रस्त्यांवर उभी केली जात आहेत. या टेस्टिंग ट्रॅकवर येण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे.तो मार्ग २० मी. लांबीचा असून पदपथ व पार्किंग विभाग सोडला तर हाच रस्ता अवघा ८ मी.चा होतो. त्यामुळे या रस्त्यावर एकाच रांगेत जाणारे व येणारे ट्रक त्यांची लागणारी लाईन व स्थानिक वाहने यामुळे राहदरीला अडथळा होत आहे. त्यातच पालिकेकडून टाकलेल्या अटीत वंडर्स पार्कचा उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी नवी मुंबई, मुंबई, पनवेल व ठाणे येथून नागरिक येतात यात सर्व वयोगटातील नागरीक असतात. त्याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालिकेने म्हंटले आहे. त्याचा व्हायचा परिणाम होऊन या ठिकाणी दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र एकंदर टेस्टिंग ट्रॅकवर येण्याचा एकमेव मार्ग हा वंडर्स पार्कच्या समोरूनच असल्याने पालिकेने कामाला दिलेली परवानगी म्हणजे या अटीबाबत खातर जमा न करताच दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अंतिमतः अपघात न होता आपल्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांवरच सोडून दिल्याचे उघड झाले आहे. मात्र पालिकेने याबाबतीत कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे अथवा वाहतूक विभागला कळवल्याचे दिसून येत नाही. पालिकेने ध्वनी व वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची अट टाकली आहे. त्याबाबतची कोणतीही परिणामी मात्र ठरवलेली नाहीत.हा भाग शांत व हिरवळीचा असल्याने प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यात अनेकदा आपला नंबर आधी लागावा यासाठी वाहने आधीच उभी करून ठेवली जातात. दलाल व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने वाहनांची गर्दी रस्त्यावर झालेली असते.त्यामुळे नियमाला बगल देऊन थेट पासिंग केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेने उरण फाट्यावर हाईट गेट लावण्यात आला असला तरी वाहनांचा त्रास काही कमी झालेला नाही.त्यामुळे एकंदर पालिकेच्या नियमांना बगल देत नियमबाह्य पद्धतीने वाहनांचे पासिंग सुरू असल्याने हा ट्रॅक नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी बनला आहे.

हायटेंशन टॉवर
हाय हायटेंशन टॉवर्स असतानाही या ट्रॅकला मंजुरी देण्यात आली होती. या ठिकाणी केमिकल व गॅसेस असलेली वाहने येत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ऐरोली येथे हायटेंशन टॉवरची तार महिलेवर कोसळल्याने महिला भाजल्याची घटना घडली होती. यावेळी महावितरणच्या पारेषण विभागाने सिडकोला हायटेंशन खालील उद्याने व बांधकाम हटविण्याची नोटिस बजावण्यात आली होती.मात्र नेरुळ येथील आरटीओ ट्रॅकबद्दल मात्र पारेषण विभाग गप्प का असा सवाल करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांची दादागिरी
या ठिकाणी अनेकदा मुंबई ठाण्यातील वाहने पासिंगसाठी येतात. त्यासाठी मुंबई व ठाण्याचे अधिकारी येतात. मात्र त्यांना या ट्रॅकबाबत व भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली जात नाही. त्यामुळे वाहने कशीही पार्क केली जातात. याबाबत अनेकदा या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास अरेरावीची भाषेत उत्तरे दिली जातात.

हा ट्रॅक रहिवाशी भागात आहे. या ठिकाणी वंडर्स पार्कसारखे प्रसिद्ध ठिकाण असताना हा ट्रॅक नियमबाह्य पद्धतीने बनवण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांना धोका आहे. सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हा ट्रॅक इथून काढून एमआयडीसी क्षेत्रात हलवण्याची गरज आहे. याबाबत प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
मंदा म्हात्रे
आमदार बेलापूर

सर्व नियम धाब्यावर बसवून ट्रॅक सुरू केला आहे. त्याबाबाबत पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. ज्या घटनांची शक्यता पत्रात वर्तवली होती. त्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र येथील नागरिक सुज्ञ आहेत. येणाऱ्या विधानसभेत मतांच्या स्वरूपात येथील त्रस्त मतदार आपली नाराजी नक्कीच दर्शवतील.
विजय घाटे
नवी मुंबई जिल्हा, सचिव भाजप

रोज या वाहनांचा त्रास वाढू लागला आहे. निर्णय कोर्टात प्रलंबित आहे. मात्र दररोज मी येथील वाहनांना काढत असतो.येथे वाहतूक होऊ नये म्हणून परिवहन विभागाने अधिकारी नेमला आहे. याबाबत पुन्हा परिवहन अधिकाऱ्यांना भेटून या वाहनांना आळा घालण्यासाठी भेटण्यात येईल. पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.
रवींद्र इथापे
स्थानिक नगरसेवक
सभागृह नेते

ही वाहने बॅचनुसार आणावीत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वाहने रस्त्यावर उभी राहत असतील व वाहतूक कोंडी होत असेल तर ते चूक आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.
राजेंद्र सावंत
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
नवी मुंबई