कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत परस्पर समन्वय महत्वाचा असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर संपर्कात राहून पुर्वनियोजन करावे व सतर्क रहावे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन. यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा तसेच नियोजनाचा मुद्देनिहाय सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेमार्फत करण्यात येणारी पावसाळापूर्व गटारे सफाई तसेच नाले सफाईची कामे 25 मे पर्यंत पूर्ण करावीत तसेच निविदा प्रक्रियेला काहीसा उशीर झालेली नालेसफाईची सहा कामे 30 मे पर्यंत पुर्ण करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील इतर प्राधिकरणांनी 25 मे पर्यंत पावसाळी कालावधीतील त्यांच्याशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करावीत असे सूचित केले. पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या.

मान्सून 2019 च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध प्राधिकरणांच्या समन्वय बैठकीचे प्रयोजन सांगत शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील यांनी पूर्वतयारी व कार्यकृती विषयी प्रास्ताविक केले. पूर्वानुभव लक्षात घेऊन पाणी साचण्याची तसेच दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे यांची पूर्व पाहणी करून त्याठिकाणी पाणी उपसापंप लावणे तसेच अनुषांगिक उपाययोजना करण्याबाबत दक्षता घेण्याचे यावेळी आयुक्तांनी सूचित केले. विविध प्राधिकरणांना त्यांच्या केबल, पाईपलाईन टाकण्यासाठी देण्यात येणारी रस्त्यावरील खोदकामांची परवानगी पूर्णत: बंद करून 30 मे पर्यंत रस्त्यांच्या पुर्नपृष्ठीकरणाची कामे पूर्ण करावीत असे आयुक्तांनी निर्देशित केले.

मॅनहोलच्या ठिकाणी झाकणे असण्याबाबत काटेकोर पाहणी करण्याचे सूचित करतानाच गटारे व नालेसफाई करताना निघणारा गाळ पुरेसा वाळविल्यानंतर लगेचच त्याठिकाणाहून हलविण्याची दक्षता घेणेबाबत आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले.

अतिक्रमण विभागामार्फत धोकादायक इमारतींची यादी जाहीर करताना विभाग अधिकारी आणि संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, पाहणी करावी व त्या भेटीचा रेकॉर्ड ठेवून सोसायटीच्या आवारातील नेमक्या कोणत्या इमारती धोकादायक आहेत याची काळजीपूर्वक तपासणी करावी व सुस्पष्ट यादी जाहीर करावी आणि आवश्यक इमारती मोकळ्या करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले. याशिवाय अनेक वर्षे बांधकाम थांबल्याने पडून असलेल्या अपूर्ण इमारतींनाही नोटीस द्याव्यात असे सूचित केले.

महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्रे याठिकाणी पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच पावसाळी कालावधीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी मौल्यवान सूचना केल्या. एम.आय.डी.सी. क्षेत्रातील बंद असलेल्या कंपन्यांमध्ये डास उत्पत्ती स्थाने निर्माण होण्याचा व त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने डासांचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेऊन त्याठिकाणी आरोग्य पथके तयार करून विशेष पाहणी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.

महापालिका मुख्यालयात वर्षभर 24 X 7 अहोरात्र सुरु असणा-या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 20 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरु करून सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबर बोटी, पाणी उपसा पंपं तसेच इतर साहित्य व उपकरणे कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे, संस्था, मंडळे, पोहणा-या व्यक्ती, हॉटेल्स, रुग्णालये, विविध प्रकारचे मदतकार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांचे संपर्कध्वनी एकत्रित करून त्याची दरवर्षीप्रमाणे माहिती पुस्तीक प्रसिध्द करावी व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही त्याला प्रसिध्दी द्यावी असे आयुक्तांनी सूचित केले. अनेक ठिकाणी उघड्या केबल्स तसेच दरवाजे नसलेल्या विद्यात ट्रान्सफॉर्मरपासून संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबत एम.एस.ई.डी.सी. प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. 30 मे पर्यंत अडथळा आणणा-या झाडांच्या फांद्यांची आवश्यकतेनुसार छाटणी पूर्ण करावी व त्यामध्येही रस्त्यावरील विजेच्या तारांजवळील छाटणी प्राधान्याने करावी असे सूचित करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना निवा-याकरीता शाळा व समाजमंदिरांचे पुनर्नियोजन करावे व त्यांच्याकरीता आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा अशाप्रकारच्या विविध छोट्या छोट्या गोष्टींवरील सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.

पावसाळी कालावधीत सर्व घटकांचा परस्परांशी समन्वय व सुसंवाद हा महत्वाचा असून सर्वांनी  आपत्ती उद्भवूच नये याकरीता सतर्क असावे व दुर्देवाने आपत्तीजनक प्रसंग उद्भवल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी तत्पर असावे असे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आवाहन केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील व श्री. महाविर पेंढारी, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, परिमंडळ उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे व श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त श्री. तुषार पवार, उद्यान विभागाचे उप आयुक्त श्री. नितिन काळे, परिवहन व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड, नगररचनाकार श्री, सतिश उगिले, शिक्षणाधिकारी श्री. संदिप संगवे, आपत्कालीन नियंत्रण विभागाचे सहा. आयुक्त श्री. बाळकृष्ण पाटील, नायब तहसिलदार श्री. मनोजकुमार सुर्वे, सिडकोचे अधिकारी श्री. जे.एल.राठोड, इंडियन कोस्टगार्डचे डेप्युटी कमांडन्ट श्री. मंझिल अडे, एनडीआरएप चे निरीक्षक श्री. मोहम्मद शकील, एम.पी.सी.बी.चे प्रादेशिक अधिकारी श्री. आय.जी.देशमुख, बेस्टचे श्री. सुशिल कुलकरणी, एपीएमसीचे श्री. एस.एन.कडकणे, एम.टी.एन.एल.चे उच्च अधिकारी श्री. डी.एन.पवार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वाहतुक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब तुपे व विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. के.जी.चव्हाण, इंडियन सेफ्टी ॲण्ड हेल्थ विभागाच्या श्रीम. अंजली अडे, टी.बी.आय.ए.चे श्री. एम.एम.ब्रह्मे, इंडियन मेडिकल असो. चे जी.डी.महेश्वरी, केमिकल ॲण्ड अल्कली असोसिएशनचे सचिव श्री. जयदेवन के. तसेच नवी मुंबई महानगरपालिका व सेंट्रल रेल्वे, एमएसईडीसीएल आणि इतर प्राधिकरणाचे आपत्कालीन विभागाशी संबंधित उच्च अधिकारी उपस्थित होते.