नवी मुंबई नेरुळ येथील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा राजीव गांधी उड्डाणपुल हा भेगांमुळे धोकादायक झाला होता. अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष झाले होते. पालिकेकडून शहरात पावसाळा पूर्व रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे.त्यातून या उड्डाणपुलावरील भेगा डांबर टाकून बुजवण्यात आल्या आहेत.

नेरुळ विभाग विकसित झाल्यावर पालिकेने या उड्डाणपुलाची उभारणी केली होती. नेरुळ पश्चिम व पूर्वेला जोडण्यात आल्याने नागरिकांना सोयीस्कर ठरले होते. पूल बनवताना दूरदृष्टी ठेवत पालिकेकडून काँक्रीटचा टिकणारा मार्ग बनवला होता. त्यात नेरुळ पश्चिमेला पाम बीच, नेरुळ विभाग कार्यालय व पुर्वेला डी. वाय. पाटील स्टेडियम, विद्यापीठ, रुग्णालय तसेच सायन पनवेल महामार्गाला हा हहग जोडलं गेला असल्याने सर्वाधिक वर्दळीचा उड्डाणपूल म्हणून गणला जातो. मात्र कालांतराने या काँक्रीटचा बांवलेल्या मार्गावर भेगा पडल्या होत्या. काही भेगा रुंद झाल्यामुळे मोटार सायकलचे चाक अडकून अपघात झाले होते. अनेकदा या भेगा उतारावर असल्याने वेगात येणाऱ्या मोटरसायकलस्वार अनेकदा पडता पडता वाचल्याचे अनेकांनी पाहिले होते. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर शहरात रस्त्यांचे पावसाळा पूर्व डांबरीकरण होत असताना मात्र या उड्डाणपूपावरील भेगा बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.