“अरे यार, कॅफेमध्ये नको जायला. तिथल्या एक कप कॉफीच्या किंमतीत आपण तीन-चार जण आरामात कॉफी पिऊ !”असा काहीसा संवाद तुम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसेसमध्ये किंवा तुमच्या कुटुंबातदेखील ऐकला असेल. कारण कॅफे आणि महागडे खाद्यपदार्थ हे जणू एक समीकरणच सर्वसामान्यांमध्ये रूढ झालं आहे. मात्र हेच समीकरण मोडीत काढलंय ते ‘पॉकेट कॅफे’ने. मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किंमतीत अतिशय चवदार खाद्यपदार्थ आणि त्यातही विशेषतः पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड कॉफीसारखे तरुणाईचे आवडते मेनू उपलब्ध करून देणाऱ्या ‘पॉकेट कॅफे’ या मराठमोळ्या ब्रँडचं श्रेय जातं ते अभिजित घाटगे आणि पल्लवी घाटगे-निंबाळकर यांना. 

Pocket Cafe, pune
पल्लवी घाटगे-निंबाळकर, सहसंस्थापिका आणि मार्केटिंग डायरेक्टर (पॉकेट कॅफे)

मूळचे सातारा जिल्ह्याचे असलेल्या अभिजित यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. बी.टेक ही पदवी प्राप्त केल्यानंतर अभिजित यांनी करियरच्या सुरुवातीला घरातील आर्थिक अडचणींमुळे काही दिवस एका आयटी कंपनीत नोकरी केली. मात्र पहिल्यापासूनच स्वतःचा एखादा व्यवसाय असावा असं स्वप्न बाळगणाऱ्या अभिजित यांचं मन नोकरीत कधीच रमलं नाही. व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तरी कुटुंबासाठी नोकरी करणं अत्यावश्यक होतं. म्हणून त्यांनी नोकरीसोबतच स्वतःचा बिझनेस सुरु करायचं ठरवलं. भारतात विशेषतः तरुणाईत वाढत असलेली कॅफे कल्चरची क्रेझ लक्षात घेऊन अभिजीत यांनी एका कॅफे ब्रँडचे हक्क विकत घेतले म्हणजेच त्या ब्रँडची फ्रँचाइजी घेतली. मात्र त्यानंतर एक वर्षातच त्या ब्रॅण्डने आपली फसवणूक केली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यात अभिजित यांचं बरंच आर्थिक नुकसानही झालं. परंतु, त्या अपयशामुळे खचून न जाता त्यातूनही मार्ग काढत आपल्याप्रमाणेच उद्योजक होऊ पाहणाऱ्या इतरांची फसवणूक होऊ नये, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा आणि विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांना परवडेल असा एखादा कॅफे सुरु करावा हा विचार अभिजित यांच्या मनात सुरु झाला आणि त्यांच्या याच विचारांना पाठिंबा मिळाला ते त्यांच्या बहीण पल्लवी घाटगे-निंबाळकर यांचा. अपयशातून यशाकडे झेप घेण्याचं अभिजित यांचं ध्येय आणि बहिणीने केलेला सपोर्ट यातूनच २०१३ साली पुण्यात स्थापना झाली ती ‘पॉकेट कॅफे’ची. 

Pocket Cafe

सन २०१३ मध्ये पॉकेट कॅफे सुरु केल्यानंतर पुढील तीन वर्षांत अभिजित यांनी या क्षेत्रातील नवनवीन बदल, स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. पॉकेट कॅफेमध्ये बनवल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांची चव ही इतर कॅफेपेक्षा वेगळी आणि हटके असावी यासाठी लागणाऱ्या सर्व कच्च्या मालाची म्हणजेच रॉ मटेरियलची निर्मिती करण्यासाठी अभिजित यांनी पुण्यात एक वेगळा कारखाना सुरु केला. या रॉ मटेरियलपासून उत्पादननिर्मिती म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं कामही या कारखान्यात केलं जातं. तेव्हापासून आजतागायत महाराष्ट्रासोबतच देशातील पॉकेट कॅफेच्या सर्व फ्रॅंचाईजींना रॉ मटेरियलचा पुरवठा पुण्यातील कारखान्यातून केला जातो. पुण्यात पॉकेट कॅफेला चांगली लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिजित यांनी पॉकेट कॅफेचा विस्तार वाढावा व रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी  २०१६-१७ च्या दरम्यान फ्रँचाइजी या प्रकारात पाऊल ठेवलं. त्यासाठी पॉकेट कॅफेचा अधिकाधिक प्रसार व प्रचार करणं आवश्यक होतं आणि यासोबतच नवोदित उद्योजकांना तसेच फूड इंडस्ट्रीत येऊन इच्छिणाऱ्यांना फ्रँचाइजीची प्रक्रिया, त्याचे फायदे, त्यातील गुंतवणूक यांविषयी माहिती देऊन ती समजावून सांगणं आणि त्यांना फ्रँचाइजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणं हे मोठं आवाहन होतं. हे आवाहन सहजपणे पूर्ण करण्यात अभिजित यांना सर्वांत मोलाची साथ लाभली ती त्यांना कॅफे सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या त्यांच्या बहीण पल्लवी घाटगे-निंबाळकर यांची.

Pocket Cafe

पुण्यात बी.एस्सी.ऍग्रीकल्चरचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी यांनी एमबीए केलं. त्यानंतर त्यांनी एका ऍग्रीकल्चर कंपनीत नोकरी केली. याशिवाय एका मासिकासाठी त्यांनी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम पाहिलं. तसेच पुण्यातील एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणूनही त्यांनी नोकरी केली. मात्र २०११ साली लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी, दोन मुलींचे संगोपन यांमुळे पल्लवी यांनी करियरमधून थोडा ब्रेक घेतला. त्यानंतर २०१५ साली त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच आपल्या करियरवरही लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपलं करियर पूर्ववत सुरळीत करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. पल्लवी यांना पाककलेची आवड आहे. त्या आवडीतूनच २०१५ साली त्यांनी केक बनवण्याचे क्लासेस सुरु केले. या केक क्लासेसना मुली आणि महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या क्लासेससोबतच पल्लवी यांनी दिवाळीचा फराळ बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. ‘श्रीसा डेलिशियस’ या त्यांच्या फराळ ब्रँडला सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच मार्केटमधून प्रचंड मागणी येऊ लागली. त्यातही पुडाच्या करंज्या, अनारसे आणि चिरोटे यांना खवय्यांची अधिक पसंती होती. श्रीसा डेलिशियसने पहिल्याच वर्षी फक्त महाराष्ट्रातचं नाही तर अमेरिकेपर्यंत मजल मारली.

Pocket Cafe

केक क्लासेस आणि श्रीसा डेलिशियसचा व्यवसाय सुरळीत चालू असला तरी यापलीकडे जाऊन आपल्या करियरला आता एक नवे वळण द्यावे, असा विचार पल्लवी यांच्या मनात सुरु झाला. मार्केटिंगमध्ये एमबीए केलं असल्याने आणि त्यासोबतच बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावरील कार्याचा अनुभव असल्याने त्या क्षेत्रात स्थिर होण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र काही दिवसांनी इतर कोणत्याही कंपनीत नोकरी करण्यापेक्षा आपलं शिक्षण आणि अनुभवाचा उपयोग बंधू अभिजित यांनी सुरु केलेल्या पॉकेट कॅफेसाठी करण्याचा निर्णय पल्लवी यांनी घेतला आणि २०१६ साली त्या पॉकेट कॅफेच्या मार्केटिंग डायरेक्टर या पदावर रुजू झाल्या. त्यातही खासकरून फ्रँचाइजीचा सर्व कार्यभार त्यांनी आपल्या हाती घेतला. फ्रँचाइजी या प्रकारात काम करताना भारतीय लोक हे अनेक इंटरनॅशनल ब्रँडची फ्रँचाइजी घेण्यास व त्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्यास लगेचच तयार होतात मात्र आपल्या इंडियन कॅफे ब्रँडसाठी खर्च करण्यास कोणी सहसा तयार होत नसल्याचे पल्लवी यांच्या लक्षात आले. त्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्यासोबतच त्यांचा विश्वास संपादन करणं आणि हे करत असतानाच आपल्या ब्रँडमध्येही नावीन्यपूर्ण बदल घडवून आणणं यावर त्यांनी विशेष भर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कोणाची आर्थिक अडचण असेल तर त्यांना मोफत फ्रँचाइजी दिली. पॉकेट कॅफेचे तीन वेगवेगळे प्रकार निर्माण केले.  ते प्रकार म्हणजे बेसिक कॅफे, प्रीमियम कॅफे आणि थीम कॅफे.

Pocket Cafe

फक्त शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील उद्योजकांनाही या क्षेत्रात यायची संधी मिळावी आणि तेथील लोकांना मॉडर्न अशा कॅफे कल्चरचा आस्वाद घेता यावा म्हणून पल्लवी यांनी खास त्यांच्यासाठी ‘बेसिक कॅफे’ हा प्रकार मार्केटमध्ये आणला. यासोबतच प्रीमियम आणि थीम कॅफे अशा वैविध्यपूर्ण प्रकारांच्या निर्मितीवरही काम सुरु केले. ‘प्रीमियम’ या कॅफे प्रकारात कॅफेमधील टेबल्स आणि इंटिरियर यांमध्ये विविधता आणली तर थीम कॅफेमध्ये एखादी वैशिष्ट्यपूर्ण थीम घेऊन त्यानुसार कॅफेची संपूर्ण रचना केली. थीम कॅफे या प्रकारात फुटबॉल थीम कॅफे, रिडींग कॅफे, टायटॅनिक कॅफे, म्युझिक कॅफे, लव्ह थीम कॅफे अशा एकापेक्षा एक सरस थीम्सची निर्मिती केली. याशिवाय कॅफेमधील वातावरणही त्या थीमला साजेसं असेल याकडे पुरेपूर लक्ष दिले. तसेच पदार्थांच्या रेट्समध्येही फ्लेक्सिबिलिटी ठेवण्यात आली. त्यामुळे पॉकेट कॅफेमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. या सर्व नवनवीन बदलांमुळे नवोदित उद्योजकांचा पॉकेट कॅफेविषयीचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. या क्षेत्रावरील विश्वास वाढला. तसेच पल्लवी व अभिजित यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे अनेक उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसोबतच, गृहिणींनी आणि इतर छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांनीही फ्रँचाइजीसाठी पॉकेट कॅफेला पहिली पसंती दिली . फ्रँचाइजी घेऊन कॅफे कल्चरमध्ये पाऊल ठेवणाऱ्या उद्योजकांना या क्षेत्रातील चढ-उतार, वाढत असलेली स्पर्धा तसेच जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल यांविषयी सर्व मार्गदर्शन पल्लवी घाटगे-निंबाळकर या करतात. सध्या त्या मुंबई आणि त्याबाहेरील सर्व फ्रँचाइजींचा कार्यभार सांभाळत आहेत. नुकतंच पल्लवी यांनी फ्रँचाइजीमध्ये रॉयल्टी पद्धतही सुरु केली आहे.

Pocket Cafe

अभिजित आणि पल्लवी यांनी अगदी कमी आणि विशेषतः मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किंमतीत कॅफे कल्चर उपलब्ध करून दिले आहे. मात्र त्यासोबतच अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं आणि उद्योजक घडवण्याचं कामही त्यांनी केलंय. सध्या या पॉकेट कॅफे फ्रँचाइजीमधील अनेक उद्योजक महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. आधी वडापावचा व्यवसाय करणाऱ्या एका गृहस्थांनी नेरळमध्ये पॉकेट कॅफेची फ्रँचाइजी सुरु केली आणि आता ते दर महिन्याला एक लाखांपेक्षा अधिक नफा मिळवत आहेत. एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी प्रति महिना ६००० रुपये वेतन घेणारा एक तरुण, महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असलेले युवक, गृहिणी, चहाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक असे सर्वचजण पॉकेट कॅफे फ्रँचाइजीच्या माध्यमातून प्रति महिना ५०,००० ते १,२५,००० रुपयांपर्यंतची कमाई करत आहेत. दिवसागणिक पॉकेट कॅफेची फ्रँचाइजी घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पॉकेट कॅफे हे काही अंशी बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यास हातभार लावत आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

Pocket Cafe

सध्या पुण्यामध्ये पॉकेट कॅफेचे ४० आउटलेट्स आहेत. याशिवाय मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, बारामती, अकलूज यांसारख्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पॉकेट कॅफेच्या फ्रँचाइजी आहेत आणि लवकरच साताऱ्यातील दहिवडी येथे पॉकेट कॅफेचा शुभारंभ होणार असल्याने आता सातारकरांनाही कमी किंमतीत कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर, सॅण्डविच या खाद्यपदार्थांसोबतच पॉकेट कॅफेचे वैशिष्ट्य असलेल्या ‘कावा कोल्ड कॉफी’ चा आस्वाद घेता येणार आहे. महाराष्ट्रासोबतच नवी दिल्ली, बंगलोर, भोपाळ, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही पॉकेट कॅफे या मराठमोळ्या कॅफे ब्रँडची चलती आहे. याशिवाय लवकरच रायचूरमध्ये या कॅफेची फ्रँचाइजी सुरु होणार आहे. नुकतंच कर्नाटक सरकारने पॉकेट कॅफेच्या १०० फ्रँचाइजीसाठी संमती दिली आहे आणि विशेष म्हणजे या फ्रँचाइजीसाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी सरकारकडूनच दिला जाणार आहे. अवघ्या तीन वर्षांत पॉकेट कॅफेच्या फ्रँचाइजींची संख्या ९० इतकी झाली आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.

Pocket Cafe

काही दिवसांपूर्वीच पल्लवी घाटगे-निंबाळकर यांना सर्वोत्कृष्ट उद्योगनिर्मितीसाठी गौरवण्यात आले आहे. कुटुंबीयांचा पाठिंबा व सहकार्य आणि भाऊ अभिजित यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास यांमुळेच आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो, असे पल्लवी सांगतात. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पॉकेट कॅफेचा विस्तार करण्याचं अभिजित घाटगे आणि पल्लवी घाटगे-निंबाळकर यांचं ध्येय असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यांच्या याच प्रयत्नांतून आता लवकरच पॉकेट कॅफे हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यास सज्ज झाला आहे. मॅक्डोनाल्ड, केएफसी, स्टारबक्स, डॉमिनोज या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या गर्दीत पॉकेट कॅफे या मराठमोळ्या ब्रँडची यशस्वीपणे सुरु असलेली घोडदौड फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतासाठी अभिमानस्पद आहे.