भर गर्दीत नागरिकांना मनस्ताप, उभे राहून करावा लागला प्रवास

नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या गळक्या बसेसमधून प्रवास करावा लागत आहे. त्याचा फटका
एमएच ४३ एच ५१५८ या नेरुळ रेल्वे स्थानक ते उलवे येथील बसमधून प्रवाशांना गळक्या बसचा फटका बसला. पावसाळी दिवस असल्याने छत्री व रेनकोट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर थेट पाण्याची धारच सुरु झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. भर गर्दीत प्रवाशांना मानास्तापास सामोरे जाण्याची वेळ आली. त्यामुळे पावसाळा सुरू व्हायच्याआधी परिवहन विभागाने आपल्या वाहनांची चाचपणी केली नसल्याचे उघड झाले.

परिवहन विभागाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अनेकदा या बसेस वाटेत बंद पडलेल्या दिसतात.त्यामुळे प्रवाशांना मात्र त्रासास सामोरे जावे लागते. त्यात सध्या पावसाळा असल्याने परिवहन विभागाला आपल्या बसेसकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र तसे होताना मात्र दिसत नाही. बस डेपोतून बाहेर पडण्याआधी त्यांची तपासणी केली जाते. त्यात वायपर्स, आरसे, गेअर्स व इतर सर्व साधनांची तपासणी केली जाते.यात डिझेल भरूनच या बसेस बाहेर पडतात.मात्र तरीही नेरुळ ते उलवेपर्यंत धावणाऱ्या बस मधून गळणारे पाणी पाहता या बसची तपासणी केली नसल्याचे उघड झाले. या गळक्या पाण्यामुळे नागरिकांना भर गर्दीत एकमेकांना खेटून बसावे लागले. तर काही प्रवाशांनी स्वतःच्या छत्र्या उघडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना तिकीट काढून व बसमध्ये जागा मिळून देखील पाऊस अंगावर झेलावा लागला. अखेरीस पाण्याची धार न थांबल्याने प्रवाशांना आपल्या जागा सोडून उभे राहून प्रवास करावा लागला.

पावसाळा सुरू होण्याआधी या बसची वॉशिंग सेंटरमध्ये नेऊन धुलाई करण्यात आली होती. त्यात बस मधून गळती होते का ते पाहण्यात आले होते. मात्र अर्धा ते पाऊण तासाच्या कालावधीत गळक्या बसेसचा अंदाज येऊ शकत नाही हे माहीत असतानाही ही बस डेपोबाहेर काढण्यात आली होती.मात्र सतत पडणाऱ्या पावसाच्या संतत धारेमुळे ही बाब उघडकीस आल्याने बसची तपासणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचे आढळून आले.

मागील पावसाळ्यात वायपर्स न लावल्याने बसेस ऐन पावसाळ्यात बस डेपोत माघारी बोलवाव्या लागल्या होत्या. या प्रकारामुळे परिवहनचा निष्कळजीपणा उघडकीस आला होता.

परिवाहनच्या ३०० ते ३२५ बसेस नवी मुंबई व शहाराबाहेर धावतात.त्यात ४ ते ५ टक्के गळक्या बस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बस तपासणीस व डेपो मॅनेजर यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. तर लहान लहान ठेकेदारांकडून अनेक नादुरुस्त असलेल्या गोष्टी लपवण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. परिवहन नागरिकांना उक्तृष्ट सेवा देण्याचा दावा करते मात्र अशा बाबींमुळे मात्र परिवहन सेवेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते.
समीर बागवान
परिवाहन सदस्य, शिवसेना