भाजप सरकारचा बहुउद्देशीय प्रकल्प असलेला नवी मुंबई विमानतळ हा चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे.

नवी मुंबई विमानतळाविषयी :
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी व्हावा यासाठी सर्वप्रथम १९९७ मध्ये नवी मुंबई येथे विमानतळ व्हावे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र २००७ मध्ये या प्रकल्पाला शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. जमीन अधिग्रहण, विविध परवानग्या, नागरिक विस्थापन, पर्यावरण संबंधातील परवानग्या यामुळे या प्रकल्पाची तारीख पुढे सरकत चालली असून मुख्यमंत्र्यांचा बहूउद्देशीय प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई विमानतळ लांबणीची विशेष कारणे : 
१. रहिवासी विस्थापन : प्रस्थापित विमानतळ असलेल्या १० गावांमधील सुमारे तीन हजार कुटुंबांच्या विस्थापनाचा मोठा प्रश्न असून यातील फक्त एक तृतीयांश कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. परिणामी अजून सुमारे दोन हजार कुटुंबांचा विस्थापनाचा मोठा  प्रश्न आहे.
२. जमीन अधिग्रहणात जास्त मोबदला मिळावा यासाठी बरेच रहिवासी आपली जागा सोडण्यास विरोध दर्शवत आहेत.
३. काही नागरिकांचा आपली परंपरागत वडिलोपार्जित जमीन – घर सोडून नवीन ठिकाणी जाण्यास नकार.
४.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सन २०१२ ते २०१६ साली केलेल्या अभ्यासातून असे निष्कर्ष समोर आले आहे की नवी मुंबई – पनवेल या भागात प्रस्तावित विमानतळाच्या दहा किलोमीटरच्या परिसरात सुमारे २८७ पक्षांच्या प्रजाती असून विमान झेपावताना तसेच उतरताना पक्षी धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.
५.विमानतळावरील धावपट्टीचे काम येत्या १६ ते १७ महिन्यात होणे अशक्य. प्रस्तावित विमानतळाच्या जागेत असणारे लहान जलस्रोत आणि टेकडी इत्यादी अडथळे व्यवस्थित करण्याचे आवाहन.
६. प्रकल्पाच्या निरीक्षणासाठी आलेल्या नागरी वाहतूक सचिव आर. एन. चौबे यांनी सप्टेंबर २०२१ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकते असा अहवाल सादर केला.
७.जमिनीचा अधिग्रहण, नागरी विस्थापन, स्थानिक विरोध, नैसर्गिक प्रश्न, कामाचा मंदावलेला वेग हे पाहता विमानतळाचे काम पूर्ण होण्यास अजून चार ते पाच वर्षे लागतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.