16 मे या राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका मुख्यालयात रंगचित्राच्या माध्यमातून डेंग्यूविषयक अभिनव जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जागर केला.

National Dengue Day

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना चौरस आकाराचे कॅनव्हासचे तुकडे व मॉस्क्युटो रिपेलन्ट पेन्ट देण्यात येऊन त्यांच्या संकल्पनेतून त्यातील पांढरा भाग रंगविण्यास सांगण्यात आले होते. हे रंगविलेले चौकोनी तुकडे एकमेकांना जोडून ‘डेंग्यूचा प्रतिबंध जर केला घरी, तर वाचेल उपचारांची वारी’ हा संदेश प्रसारित करणारे तयार झालेले रंगचित्र महापालिका कर्मचा-यांनी एकत्रितपणे केलेला जनजागृतीचा सामुहिक अविष्कार होता. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनवंती घाडगे व डॉ. उज्वला ओतुरकर, कार्यकारी अभियंता श्रीम. शुभांगी दोडे आदी मान्यवर उपस्थित राहून उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

National Dengue Day

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर यांनी डेंग्यूचा आजार कशाप्रकारे होतो, डेंग्यू होऊच नये याकरीता काय काळजी घ्यावी, डेंग्यू झाल्यावर कोणते उपचार घ्यावेत, कुटुंबिय व परिसरातील नागरिकांना करावयाच्या उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी उपस्थितांना मनोरंजनातून आरोग्य शिक्षण देणा-या ल्युडोसारख्या खेळाची हस्तपत्रके वितरित करण्यात आली. राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे मुलांसाठी एका विशेष मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

National Dengue Day

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या पावसाळापूर्व उपाययोजना करतानाच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळी कालावधीत डास उत्पत्ती होऊ नये याकरिता नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी आत्तापासूनच जनजागृती करण्यात येत असून यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचाही सक्रीय सहभाग असावा यादृष्टीने जागतिक डैंग्यू दिवसाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात विशेष उपक्रम राबविण्यात आला.