श्री गणेशोत्सव 2015 सुव्यवस्थितरित्या आयोजनासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यांचे संयुक्त आवाहन : श्री गणेशोत्सव 2015 च्या पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी पुर्वतयारीस प्रारंभ केला असून उत्सव आयोजनासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्रक्रियेत सुलभता यावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई यांचे वतीने संयुक्तरित्या ‘एक खिडकी’ संकल्पना राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयातील या विशेष कक्षामार्फत महापालिका, पोलीस, अग्निशमन, एम.एस.ई.डी.सी. यांच्या अधिका-यांमार्फत एकत्ररित्या पाहणी करुन परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव मंडळाने सर्वप्रथम आपल्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये परवानगीसाठी अर्ज सादर करावयाचा आहे. पोलीसांनी व महानगरपालिकेने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रातील / परवानगी पत्रातील नमूद अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे मंडळांना बंधनकारक आहे.

मा.उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करूनच श्रीगणेशोत्सव मंडळांनी स्टेज, मंडप उभारण्याची कार्यवाही करावयाची आहे. मंडळांनी मंडप/स्टेज उभारताना 75 टक्के रस्ता वाहतुकीस तसेच पदपथ रहदारीला खुले राहतील याची खबरदारी घ्यावयाची असून मंडप, स्टेज व कमानी उभारताना रस्त्यांवर खड्डे होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. खांब रोवण्याकरीता वाळुच्या ड्रमचा वापर करावयाचा आहे. मंडपापासून 15 मीटर इतक्या परिसरात कमान असावी व त्यावर वाणिज्य स्वरुपाच्या जाहिराती असू नयेत, तसेच कमानीची उंची 22 फूटांपेक्षा कमी नसावी.

दुर्दैवीरित्या कोणतीही दुर्घटना घडून उत्सवाला गालबोट लागू नये याकरीता मंडळांनी आवश्यक ती काळजी घ्यावयाची असून नोंदणीकृत कंत्राटदाराकडून विद्युत विषयक कामे करुन घ्यावयाची आहेत. मंडळांनी अनधिकृतपणे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत खांबावरुन विद्युत पुरवठा घेऊ नये. त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपक यंत्रणेचा त्रास परिसरातील नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी  इत्यादींना होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियम व मा.उच्च न्यायालयाचे आदेशांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

श्रीगणेशमुर्तीची, मंडपाची व परिसराची सुरक्षा (सीसीटिव्ही लावणे, आवश्यक स्वयंसेवक व्यवस्था ठेवणे इ.) तसेच गर्दीचे नियोजन करणे यासंबधीची जबाबदारी मंडळाची असेल. मंडपाचे ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जनरेटर, अग्निशमन यंत्रे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे श्रीगणेशोत्सव मंडळ ज्या ठिकाणी श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन करणार आहे त्याबाबतची माहिती संबधित विभाग कार्यालयास मंडळाने पूर्वपरवानगी अर्जासोबत द्यावयाची आहे आणि महानगरपालिकेने निश्चित केलेल्या विसर्जन स्थळावरच श्रीगणेशमुर्तीचे विसर्जन करावयाचे आहे.

सर्व श्रीगणेशोत्सव मंडळांनी आवश्यक परवानगी घेऊन कायदा व सुव्यवस्थेची जपणुक करीत सुनियोजीतरित्या श्रीगणेशोत्सव आयोजनाकरीता नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई यांस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे आणि पोलीस आयुक्त श्री. प्रभात रंजन यांच्या वतीने करण्यात येत आहे.