बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईचा मानबिंदू असून अशा प्रकारच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे”, असे उद्गार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, सिडको यांनी काढले. बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण समारंभाचे उद्घाटन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी मंदा म्हात्रे, विधानसभा सदस्य, बेलापूर व संदीप नाईक, विधानसभा सदस्य, ऐरोली; हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको व अशोक शिनगारे, व्यवस्थापकीय संचालक-1, सिडको, डॉ. रामास्वामी एन, आयुक्त, नवी मुंबई मनपा, सुनिल पाटील, नगसेवक, नवी मुंबई मनपा व संपत शेवाळे, माजी स्थायी समिती सदस्य, नवी मुंबई मनपा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे केशव वरखेडकर, मुख्य अभियंता, नवी मुंबई हेही या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून झाली. या प्रसंगी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज, बाल राजाराम महाराज यांच्या वेशभूषा धारण केलेल्या कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवत कार्यक्रमास साजेशी ऐतिहासिक वातावरण निर्मिती केली.

‘जो देश आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवूही शकत नाही’ या वचनाचा दाखला देत प्रशांत ठाकूर यांनी ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंकडे दुर्लक्ष करणे उचित नाही असे सांगत इतिहास व संस्कृतीची कास धरतच सिडको विकास पथावरून मार्गक्रमण करणार असल्याचे सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी सिडकोच्या विकास प्रकल्पाचांही संक्षिप्त आढावा घेतला.

या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा बेलापूरचा किल्ला हे आपले वैभव असून त्याचे येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करणे आवश्यक असल्याचे सांगत किल्ल्याचे संवर्धन व सुशोभिकरण केल्याने नवी मुंबईतील ऐतिहासिक व पर्यटन स्थळाची उणिव भरून निघेल असे सांगितले.

नवी मुंबईला इतिहास नाही हा गैरसमज असून नवी मुंबई परिसराला विविध ऐतिहासिक कालखंडांत महत्त्व होते, असे सांगत श्री. संदीप नाईक यांनी बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.

सदर संवर्धन व सुशोभिकरण उपक्रमाचा आढावा घेताना लोकेश चंद्र यांनी बेलापूर किल्ल्याचे मूळ रूपात संवर्धन करून किल्ल्याचा परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमा अंतर्गत ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित किल्ल्याच्या इतिहासाचे सादरीकरण, ॲम्फी थिएटर, खुला रंगमंच या सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे सांगत भविष्यात बेलापूर किल्ला हे टुरिस्ट डेस्टिनेशन ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको यांनी केले.