-नमुंमपा अधिकारी-कर्मचारी संघटनेचे आंदोलन तुर्तास मागे

नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना ७ वेतन आयोग लागू करण्या बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या ९ मेपासून कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन करु, असा इशारा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने महापौर, आयुक्तांना लेखी निवेदनातून दिला होता. याची दखल घेत महापौर जयवंत सुतार यांनी तात्काळ पत्र पाठवून पालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. महापौर सुतार यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधत पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. हे रजेवर असल्याने पुढील आठवडयात ते आल्यानंतर चर्चा करुन योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शुक्रवार ९ मे रोजी होणारे आंदोलन पुढे ढकलल्याचे सांगत. पाच ते सहा दिवसात चर्चा न झाल्यास कामबंद आंदोलन करुनच दाखवू, असा इशारा बोलताना दिला आहे. 

या विषयी अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, महापौर सुतार यांनी तीन दिवसांपुर्वी संघटनेच्या इशार्‍यानंतर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पालिका प्रशासन महापालिकेत प्रतिनियुक्त अधिकार्‍यांबाबत जर वेगळा आणि इतर अधिकारी, कर्मचार्‍यांबाबत वेगळा न्याय घेत असेल तर ही बाब चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. महासभेने केलेला ठराव हा सर्वानुमते असतानाही जर केवळ प्रशासनाच्या आठमुठेपणाची भुमिका घेत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये असंतोष पसरला असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा लेखी अहवाल देण्याचे आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी आदेश दिले आहेत. 

दरम्यान आज महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत संघटनेच्या सदस्यां सोबत आज (ता.७) झालेल्या चर्चेत महापौरांनी कामागारांना न्याय देण्यासाठी आपणही प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. महासभेत मंजूर केलेला ठराव प्रशासनाने तातडीने मंजूर करुन कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली असल्याचे महापौर म्हणाले. आयुक्त डॉ.रामास्वामी एन. हे सध्या रजेवर असल्याने याबाबत निर्णय घेण्या संदर्भात चर्चा करुन सोडविण्याचे आश्‍वासन संघटनेच्या सदस्यांना दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शुक्रवारचे आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले.

=संघटनेला सर्वच स्तरातून पाठिंबानमुंमपा अधिकारी-कर्मचारी संघटनेने कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमक भुमिका घेतली आहे. शुक्रवारी होणार्‍या कामबंद आंदोलनाला अग्निशमक, शिक्षक, सफाई, पाणीपुरवठा अशा विविध आस्थापनातील कर्मचार्‍यांनी भरभरुन पाठिंबा दिला आहे. एकीकडे कर्मचार्‍यांचा पाठिंबा मिळत असताना पोलिसांमार्फत दबाव तंत्र देखील सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.