२३ मार्च १९३१ रोजी इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येच्या आरोपावरून भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव या भारताच्या तीन सुपुत्रांना लाहोर जेलमध्ये फासावर दिले गेले. तेव्हापासून हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फासावर गेलेल्या या महान स्वातंत्रवीरांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटनांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा –  

भगतसिंग –  * भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी बंगा येथे झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली व म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्यांचे नाव भगतसिंग असे ठेवले.

* भगतसिंग यांचे प्राथमिक शिक्षण दयानंद अँग्लो वैदिक या शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये सुखदेव हे भगतसिंग यांचे वर्गमित्र होते तर प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे त्यांच्या २ वर्षे पुढे होते. 

* अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या भगतसिंग यांना पाच भाषा अवगत होत्या. खूपच कमी वयात ते इंग्लिश, अरेबिक, पोलिश, फ्रेंच आणि स्वीडिश या भाषा अस्खलितपणे बोलायचे. जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाले होते. बालपणापासूनच स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहिलेल्या भगतसिंग यांना स्वातंत्र्यसेनानी व्हायचे होते व यासोबतच देशात शांतताही नांदावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. 

* आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवे आहे हे खूप आधीच भगतसिंग यांना समजले होते. भगतसिंग यांनी विवाह करावा अशी त्यांच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती मात्र कोणत्याही भौतिक सुखात रस नसलेल्या भगतसिंग यांनी लग्न ठरल्यावर आपले घर सोडले.’आझादी ही मेरी दुल्हन है’ असा विचार असलेल्या भगतसिंग यांनी आपण लग्न करू शकत नाही असं घरी कळवून घरच्यांची क्षमा मागितली. 

* भगतसिंग हे एक उत्कृष्ट लेखक होते. कानपूरला आल्यावर ‘बलवंतसिंग’ या नावाने ते लेख लिहीत असत. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असताना त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ हा प्रसिद्ध नारा लिहिला. सेंट्रल असेम्बलीत आपल्या साथीदारांसह बॉम्ब फेकल्यानंतर त्यांनी’इन्कलाब झिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या होत्या. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ  ‘दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स – १८५७’ हा भगतसिंग यांना अगदी तोंडपाठ होता. लेखनासोबतच त्यांना अभिनयाचीही आवड होती. महाविद्यालयीन काळात त्यांनी राणा प्रताप, सम्राट चंद्रगुप्त आणि भरत दुर्दशा या नाटकांमध्ये काम केलं होतं. खूपच कमी लोकांना माहित आहे की भगतसिंग हे बॉलिवूड अभिनेता अमीर खानचे पूर्वज आहेत.    

शिवराम हरी राजगुरू – *पुणे जिल्ह्यातील खेड (सध्याचे राजगुरूनगर) येथे १९०८ साली एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांनी  वाराणसीत येऊन संस्कृत भाषेचा आणि हिंदू धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. 

* छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गनिमी कावा या युद्धशैलीबद्दल त्यांना अतिशय आदर होता. काही काळानंतर ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. यानंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे सक्रिय सदस्य बनले. धाडसी व्यक्तिमत्त्व असलेल्या राजगुरू यांनी आपल्या मातृभूमीला नेहमीच पूज्यस्थानी मानले. 

* उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ते अधिक सक्रिय होते व कानपुर, आग्रा आणि लाहोर येथे त्यांची मुख्यालये होती. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग हे राजगुरू यांचे खूप चांगले मित्र होते.  राजगुरू हे एक उत्तम शार्प शूटर तर होतेच शिवाय त्यांच्या पक्षामध्ये ते गनमॅन म्हणूनही प्रसिद्ध होते. राजगुरूंनी अनेक क्रांतिकारी चळवळींमध्ये सहभागी होऊन आपल्या पराक्रमाने क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले.

* राजगुरूंच्या पराक्रमाचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रज अधिकारी सॅंडर्सचा वध. लाला लजपतराय यांच्या हत्येचा सूड म्हणून १७ डिसेंबर, १९२८ रोजी त्यांनी पोलीस मुख्यालयासमोरच साधलेल्या अचूक निशाण्यामुळे सँडर्सचा वध झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली आणि लाहोरमध्ये झालेल्या खटल्यात राजगुरू यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

सुखदेव –  * १५ मार्च, १९०७ रोजी लायलपूर (पाकिस्तानातील सध्याचे फैसलाबाद) येथे सुखदेव थापर यांचा जन्म झाला. सुखदेव अवघ्या तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे धाकटे बंधू त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी जन्माला आले. सुखदेव यांचे सुरुवातीचे शिक्षण लुधियानात झाले. निडर व करारी स्वभावाच्या सुखदेव यांनी त्यांच्या पक्षाची व पक्षातील प्रत्येक सदस्याच्या छोट्या-छोट्या गरजांची काळजी घेतली. कॉम्रेड शिव वर्मा यांना लाहोर कटात  जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर कैदेत असताना त्यांनी सुखदेव यांचे चरित्र लिहिले.

* भगतसिंग यांनी असेंम्बलीमध्ये बॉम्ब टाकल्यानंतर विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छापेसत्रात लाहोरमध्येही छापे टाकण्यात आले व त्यावेळी काश्मीर बिल्डिंगमध्ये पडलेल्या छाप्यात काही बॉम्ब जप्त करण्यात आले. हे बॉम्ब सुखदेव यांनी तयार केले होते म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणून सुखदेव यांच्या नावाची नोंद करण्यात आली. नवनवीन सदस्य जमवून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे काम देण्याचे कौशल्य सुखदेव यांच्याकडे होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची सजा सुनावण्यात आली व २३ मार्च, १९३१ ते भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर ते लाहोर तुरुंगात फाशी गेले.