नुकतंच भारताच्या महिला क्रिकेट संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधानाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१८ या वर्षातील वनडे क्रिकेटमधील ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ म्हणून गौरविले आहे. स्मृतीने न्यूझीलंडविरोधात झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत एक शतक व ९० रन्सची नाबाद खेळी करत जागतिक वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी मजल मारली. या सीरिजमध्ये स्मृतीने तिच्या करियरमधील चौथे वनडे शतक लगावले. मागील वर्षाच्या सुरुवातीपासून झालेल्या १५ वनडे सामन्यांत स्मृतीने २ शतके व ८ अर्धशतके नोंदविली असून संपूर्ण वर्षात ६६.९० च्या सरासरीने ६९६ धावा करत तिने २०१८ या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. यासोबतच स्मृतीने फोर्ब्स इंडियाच्या २०१९मधील ’30 Under 30′ या यादीतही स्थान पटकावलं आहे. पूर्वीपासूनच पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या क्रिकेट या खेळात अग्रस्थान मिळवणाऱ्या स्मृतीच्या करियरचा थोडक्यात आढावा आज आपण न्यूज विथ चाय सोबत घेणार आहोत.

* सांगलीकर असलेल्या स्मृतीचा जन्म मुंबईमध्ये स्मिता व श्रीनिवास मंधाना यांच्या घरी झाला. त्यानंतर स्मृती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंबीय सांगलीतील माधवनगर येथे स्थायिक झाले व स्मृतीचे शालेय शिक्षणही तिथेच पूर्ण झाले.

* स्मृतीला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळाले. तिचे वडील श्रीनिवास मंधाना व भाऊ श्रवण मंधाना यांना क्रिकेटची आवड असून ते दोघेही सांगलीसाठी जिल्हास्तरीय पातळीवरील क्रिकेट सामने खेळले आहेत. स्मृतीने एकदा महाराष्ट्र राज्य संघाकडून १६ वर्षाखालील क्रिकेट सामन्यांत श्रवणला खेळताना पाहिले व तिथूनच तिला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

* वयाच्या नवव्या वर्षी स्मृतीची १५ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली व ती ११ वर्षांची असताना महाराष्ट्र अंडर १९ या संघात खेळण्याची संधी तिला मिळाली.

* देशांतर्गत होणाऱ्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर स्मृतीच्या आंतराराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली ती ऑगस्ट २०१४ मध्ये, त्यावर्षी वोर्मस्ले पार्क येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासून. पदार्पणाच्या कसोटीतच पहिल्या व दुसऱ्या डावांत अनुक्रमे २२ आणि ५१ धावा करून स्मृतीने भारताला त्या मालिकेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतरच्या डावात १८२ रन्सचा पाठलाग करताना स्मृतीने तिरुष कामिनीसह ७६ धावांची सलामी दिली.

* २०१६ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वनडे सामन्यात स्मृतीने १०९ बॉल्समध्ये १०२ रन्सची खेळी करून तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकवलं.

* जानेवारी २०१७ मध्ये मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘वुमन्स बिग बॅश लीग’ मध्ये मेलबर्न रेनेगेड्स या संघाविरुद्ध खेळत असताना शेवटच्या बॉलवर फिल्डिंग करतेवेळी स्मृतीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती व त्यामुळे तिला आरामासाठी पुढील सामन्यांतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पाच महिन्यांनी २०१७ च्या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्मृतीचा समावेश करण्यात आला. पाच महिन्यांच्या रिकव्हरीच्या काळात स्मृती वर्ल्डकपची क्वालिफायर व दक्षिण आफ्रिकेतील क्वाड्रैंगुलर मालिकेतही खेळू शकली नाही. मात्र असे असूनदेखील वर्ल्डकपच्या पहिल्या ग्रुप मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना स्मृतीने ९० रन्सची तडाखेबाज खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली व स्मृती मंधाना त्या मॅचची ‘सामनावीर’ ठरली. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात १०६ रन्सची दमदार खेळी करून तिने आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे करियरमधले दुसरे शतक झळकावले.

* स्मृती मंधाना ही २०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण भाग होती. त्या मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर ९ रन्सने मात केली असली तरी त्या संपूर्ण स्पर्धेतील भारतीय महिला क्रिकेट टीमच्या चमकदार कामगिरीने अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.

* २०१८ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच स्मृतीने आपल्या खेळातला फॉर्म कायम ठेवला. मार्च २०१८ मध्ये भारतात झालेल्या ‘वुमन्स इंटरनॅशनल टी-२०’ स्पर्धेत स्मृतीने वेगवान अर्धशतक लगावले. या स्पर्धेत २५ बॉल्समध्ये ५० रन्स करणारी स्मृती मंधाना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. या अर्धशतकासोबतच स्मृतीने तत्पूर्वी खेळलेल्या ‘२०१७-१८ इंडिया वुमन्स ट्रायनेशन सीरिज’ या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तिने स्वतःच रचलेला ‘३० बॉल्समध्ये ५० रन्स’ हा रेकॉर्डही मोडला. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन दिवसांच्या वनडे सीरिजमध्ये स्मृतीने ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ हा अवॉर्ड मिळवला. तसेच ३ ऑगस्ट, २०१८ रोजी ‘वुमन्स क्रिकेट सुपर लीग २०१८’ या स्पर्धेत स्मृतीने शतकी खेळी केली. हे शतक तिच्या या लीगमधील कारकिर्दीतलं पहिलं शतक होतं.

* ऑक्टोबर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजमधील ‘वुमन्स वर्ल्ड टी-२०’ या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात स्मृतीचाही समावेश होता. या टुर्नामेंटमधील उत्कृष्ट परफॉर्मन्समुळे स्मृतीला ‘स्टार ऑफ द टीम’ म्हणूनही नामांकित करण्यात आले. याच स्पर्धेदरम्यान महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकारात १००० धावा करणारी स्मृती मंधाना ही तिसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

* फक्त आंतराराष्ट्रीयच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही स्मृतीने आपल्या उत्तम कामगिरीने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यातीलच काही महत्त्वपूर्ण घटना सांगायचं झालं तर स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाआधी म्हणजेच ऑक्टोबर २०१३ मध्ये गुजरातविरुद्ध महाराष्ट्रासाठी खेळताना वडोदराच्या आलेम्बिक क्रिकेट ग्राऊंडमध्ये ‘वेस्ट झोन अंडर १९’ टुर्नामेंटमध्ये १५० चेंडूंमध्ये नाबाद २२४ धावा केल्या व त्यासोबतच वनडे मध्ये ‘पहिलं द्विशतक’ करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू हा सन्मान स्मृतीने मिळवला.

* सप्टेंबर २०१६ मध्ये, महिलांच्या ‘बिग बॅश लीग’ (डब्ल्यूबीबीएल) साठी ब्रिस्बेन हिटने भारतीय क्रिकेटर हरमनप्रीत कौर हिच्यासह स्मृती मंधानासोबत एक वर्षाचा करार केला होता. ही लीग साइन करणाऱ्या हरमन आणि स्मृती या दोघी पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत.