वाहतूक विभागाच्या वतीने कॅम्पस विथ हेल्मेट हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालयापासून करण्यात आली होती. त्यानुसार बाईकस्वारांन हेल्मेट वापरण्याविषई जागृती करण्यात आली होती. मात्र तरीही अनेक पालिका कर्मचाऱ्यांकडून विना हेल्मेट मोटर सायकल चालवणे सुरूच ठेवले होते. मात्र अशा बेशिस्त पालिका कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांनीच शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. या सुरक्षारक्षकांनी अशा हेल्मेट न घातलेल्या कर्मचाऱ्यांना व पालिकेत कामानिमित्त भेट देणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्या मोटरसायकल्स आतमध्ये नेऊन न देता बाहेर ठेवण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे पालिकेच्या मुख्यालयाबाहेर सध्या अनेक बाईक दिसू लागल्या आहेत.

नवी मुंबई वाहतूक विभागाकडून कॅम्पस विथ हेल्मेट हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोटारसायकलस्वार हेल्मेट न घालता प्रवास करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यानुसार रुग्णालये, कॉलेज व कार्यालयांच्या आवारात जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार अशा ठिकाणी कॅम्पस विथ हेल्मेट असा संदेश लिहिलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी विना हेल्मेट लावणाऱ्यांना प्रवेश देऊ नये असे आदेश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे सर्वात वर्दळीचे मानले जाते. कर्मचाऱ्यांसोबत शहरातील नागरिकांचा सतत राबता असतो.मात्र मुख्यालायजवळ राहणारे कर्मचारी व नागरिक बिनदिक्कतपणे विना हेल्मेट मोटरसायकल घेऊन येतात. पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर जनजागृती करून व कॅम्पस विथ हेल्मेटचा फलक लावूनही अनेकजण विना हेल्मेट पालिका मुख्यालयात येत होते. अखेर सुरक्षारक्षकांनी त्यांना दिलेल्या आदेशानुसार अशा बेशिस्त व विना हेल्मेट मोटरसायकल घेऊन येणाऱ्यांना प्रवेश नाकरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हेल्मेट घाला व आत प्रवेश करा अन्यथा हेल्मेट नसेल तर मोटारसायकल बाहेर ठेवून आत चालत जा असा शिस्तबद्ध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सुरुवातीला जास्त प्रमाणात विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसला असून हळूहळू ही विना हेल्मेट येणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने बेशिस्त कर्मचारी व नागरिकांना सुरक्षारक्षकांनीच चांगलाच शिस्तीचा धडा शिकवल्याची चर्चा पालिका मुख्यालयात रंगली आहे.