प्रचारादरम्यान कपिल पाटलांचे आश्वासन

भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात प्रचार करतांना भाजप चे खासदार कपिल पाटील यांनी वाडा शहराचा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एम. एम. आर. डी. ए. त समावेश करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. वाडा तालुक्यात भाजप, शिवसेना, श्रमजीवी संघटना, कुणबी सेना, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ वाडा येथे रॅलीचे आयोजन केले होते. या रॅली दरम्यान खासदार कपिल पाटील यांनी विविध गावांत जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान या रॅलीसाठी सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार शांताराम मोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, वाडा नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, भाजप ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, बाबाजी काठोळे इत्यादी उपस्थित होते.

एम. एम. आर. डी. ए. त समावेश केल्यास वाडा तालुक्यात देखील भिवंडी शहराप्रमाणे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, तसेच विविध विकास कामे होतील तसेच एम. एम. आर. डी. ए.त समावेश झाल्यास थेट एम. एम. आर. डी. ए.च्या निधीतून तालुक्यात पायाभूत सुविधा पुरवता येतील असे आश्वासन खासदार कपिल पाटील यांनी दिले. वाडा तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान खासदारांनी वाडा बस स्थनाकात जाऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या.​