जागतिक महिलादिन विशेष

एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते आणि फक्त कुटुंबालाच नाही तर समाजालाही सुशिक्षित करते, असा विचार महात्मा फुले यांनी समाजाला दिला. ही शिकवण केवळ समाजालाच न देता त्यांनी स्वतःही अंगिकारली व त्यांच्यामुळेच भारताला सावित्रीबाई फुलेंसारखी पहिली महिला शिक्षिका लाभली. सावित्रीबाईंचा शिक्षणाचा हाच वारसा पुढे सातत्याने सुरु ठेवून आज अनेक महिला ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे करत आहेत. सावित्रीच्या लेकी करत असलेल्या या ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्यामुळे आजपर्यंत अनेक सुशिक्षित पिढ्या घडल्या व घडत आहेत. असंख्य महिला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजासाठी एक प्रेरणास्थान बनत आहेत. यातीलच एक म्हणजे बेलापूर येथील ‘गुड शेफर्ड’ या शाळेच्या मुख्याध्यापिका लता प्रकाश पवार.

सुरुवातीच्या काळात नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत असतानाच लता यांच्या मनात ज्या समाजाचं आपण देणं लागतो त्या समाजासाठी काहीतरी  करण्याची इच्छा निर्माण झाली. विषेशतः त्यांनी डी.इडची पदवी प्राप्त केली असल्याने समाजातील तळागाळातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी एक शाळा सुरु करावी हा विचार त्यांच्या मनात सुरु झाला. मात्र नोकरी करत असल्यामुळे आपण आपल्या इच्छा-आकांक्षा व विचार प्रत्यक्षात साकार करू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शाळा सुरु करण्याची आपली इच्छा पती प्रकाश पवार यांना सांगितली. प्रकाश यांनी आपल्या पत्नीला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लगेचच होकार दर्शवून पाठिंबा दिला. पतीने दिलेली साथ व आपल्यावर दाखवलेला विश्वास यांमुळे लता यांचा आत्मविश्वास वाढला व त्यातूनच २५ डिसेंबर, २००१ रोजी स्थापना झाली ती ‘गुड शेफर्ड’ या शाळेची! 

स्थापनेनंतर २००२ सालच्या जून महिन्यात नवी मुंबईतील बेलापूरमधील दिवाळे या गावात एका छोट्याशा खोलीत गुड शेफर्ड शाळेची पहिली बॅच सुरु झाली. या शाळेच्या पहिल्या वर्षाच्या या पहिल्याच बॅचमध्ये ५३ विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. प्रथम वर्षातच शाळेला मिळत असलेला भरभरून प्रतिसाद बघून लता यांना काम करण्यास अधिकच प्रोत्साहन मिळालं आणि शाळेतील मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी लता यांनी बऱ्याच आर्थिक अडचणी असतानादेखील स्वतःचे राहते घर, दागिने विकून कर्ज घेतले आणि त्यातून शाळेसाठी जमीन विकत घेऊन तिथे बिल्डिंग बांधली. ५३ विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज ५७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे ज्या मुलांना इतर शाळेत प्रवेश मिळत नाही अशा मुलांना या गुड शेफर्ड शाळेत विनादिक्कत प्रवेश दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा, स्पोर्ट्स, स्नेहसंमेलन हे कार्यक्रम शाळेतर्फे आयोजित केले जातात. केवळ विद्यार्थीच नाही तर पालकांसाठीही रांगोळी, पाककला इ. स्पर्धा आयोजित करण्यात येतात. याशिवाय नर्सरी ते दहावीपर्यंतचं शिक्षण देणाऱ्या या गुड शेफर्ड शाळेत यावर्षीपासून अकरावी, बारावीचे शिक्षण सुरू करण्याचा लता पवार यांचा उद्देश आहे व त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसही सुरूवात झाली असल्याचं त्यांनी न्यूज विथ चायसोबत संवाद साधताना सांगितलं.

आजपर्यंतची एकूणच वाटचाल पाहता एका छोटाश्या रोपट्याचं रूपांतर जसं एखाद्या डेरेदार वृक्षात होतं, त्याप्रमाणे या ‘गुड शेफर्ड’ शाळेची प्रगती झाली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. लता पवार यांच्या या यशोगाथेवरुन हेच सिद्ध होतं की, तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत, जिद्द आणि कोणत्याही अडचणीला सामोरं जाण्याची तयारी हे गुण जर तुमच्याकडे असतील तर या जगात तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही.