– NWC प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार प्रयत्न करीत असून शेतकरी सन्मान योजनेची ठाणे जिल्ह्यात उत्तम अंमलबजावणी करण्यात येईल असे बंदरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. ते आज डोंबिवलीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ११ फेब्रुवारीपर्यंत डोंबिवलीच्या सावळाराम महाराज म्हात्रे स्टेडीयम येथे हा महोत्सव सुरु राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे, कृषी सभापती उज्वला गुळवी, महिला बालकल्याण सभापती दर्शना ठाकरे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, आत्माचे प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे हे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना गट स्थापन करण्यासाठी शासन मदत करीत असते, या माध्यमातून त्यांना त्यांचा विकास करता येणे शक्य आहे असे सांगून रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे सांगितले. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रयोग सुरु असून शेतकऱ्यांनी या संशोधनाचा फायदा करून घ्यावा. वांगणीमध्ये फुलणाऱ्या गुलाबाची विदेशात निर्यात होते त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी फुशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करावी असे आवाहनही त्यांनी केले. बदलापूर परिसरात मोगऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते परंतु शेतकरी बाजारपेठेत वेळेवर पोहचू शकत नाही असेही ते म्हणाले. मंजुषा जाधव याप्रसंगी म्हणाले की डोंबिवलीतील या कृषी महोत्सवाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. वाडा परिसरातील पिकविल्या जाणाऱ्या भाताला आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व असल्याने डॉक्टर्ससुद्धा याची दखल घेतात असे सांगून त्या म्हणाल्या की, शहापूर भागात होणाऱ्या भेंडीची निर्यात परदेशात होते ही जिल्ह्याच्या दृष्टीने समधानाची गोष्ट आहे.

शेतकऱ्याचा सन्मान

येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी पुरस्कार मिळालेल्या कैलास राघो बराड, शहापूर, दिलीप बाबाजीराव देशमुख, वांगणी, लक्षमण गंगा पागी, शहापूर, विनायक मारुती पोटे, विजया अरविंद पोटे, यांचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय आत्मा अंतर्गत गट राजमाता शेतकरी स्वयंसहायता गट, कृषिभूषण शेतकरी स्वयंसहायता गट, समर्थ सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट, सप्तशृंगी शेतकरी गट यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण, शहापूर, मुरबाड मधील ३१ शेतकऱ्यांना देखील गौरविण्यात आले.

कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

यावेळी कृषी प्रदर्शनात ३० दालने शासनाच्या विभागांची असतील तर २५ कृषी निविष्टा, ५ दालने कृषी तंत्रज्ञान, ३० दालने गृहोपयोगी वस्तू, ५ दालने कृषी यंत्रसामुग्री,व अवजारे, त्याचप्रमाणे ५५ दालने ही धान्ये, व खाद्यपदार्थे यांची असतील. नामवंत कंपन्यांचा यात समावेश असेल.

या कृषी महोत्सवात विविध परिसंवाद, चर्चा सत्रे, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात आले आहे.