कृषीविषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार,विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे या उद्देशाने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत डोंबिवलीत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे स्टेडियम येथे हा महोत्सव होईल,अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम.चांदवडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषिविषयक परिसंवाद, व्याख्याने या माध्यमातून तसेच विचारांच्या देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण त्याचबरोबर विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजारभिमुख कृषी उत्पादन आणि विपणनास चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पीएम चांदवडे यांनी सांगितले. याप्रसंगी कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे हे उपस्थित असणार आहेत.

या कृषी महोत्सवात विविध परिसंवाद, चर्चा सत्रे, प्रदर्शने यांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील,पालकमंत्री एकनाथ शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण ,जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार आदींची उपस्थिती असणार आहे.

* कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

यावेळी कृषी प्रदर्शनात ३० दालने शासनाच्या विभागांची असतील तर २५ कृषी निविष्टा, ५ दालने कृषी तंत्रज्ञान, ३० दालने गृहोपयोगी वस्तू, ५ दालने कृषी यंत्रसामुग्री व अवजारे त्याचप्रमाणे ५५ दालने ही धान्ये, खाद्यपदार्थे यांची असतील. अनेक नामवंत कंपन्यांचा यात समावेश असेल. गुरुवारी ७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता उद्घाटन होईल व त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रमाणीकरण तज्ञ प्रशांत नायकवाडी यांचे मार्गदर्शन होईल.

* प्रगतीशील शेतकरी, तज्ञांचे मार्गदर्शन

दुसऱ्या दिवसापासून भात पिक लागवड, जागतिक पर्यावरण समस्या आणि उपाय, भाजीपाला लागवड, सेंद्रिय शेती, शेडनेटमधील भाजीपाला, परदेशी भाजीपाला, कृषी मालाचे पणन, कृषी निर्यातीच्या संधी, बँकांच्या विविध योजना , मधुमक्षिकापालन अशा विविध विषयांवर विविध तज्ञांचे व्याख्यान त्याचप्रमाणे चर्चासत्रे देखील होतील. कृषी भूषण शेतकरी राजेंद्र भट्ट, शेखर भडसावळे, कृषी संशोधन केंद्रांचे अधिकारी एल.एच.चव्हाण, श्री.कुनकेकर, श्री. म्हसकर, एचटीसीचे अधिकारी संतोष डोईफोडे, रवींद्र देशमुख, विश्वास जाधव, शहापूरचे प्रगतीशील शेतकरी मकरंद चुरी, मुरबाडचे विजय बारकू धलपे, दिगंबर विशे, डॉ. विलास सुरोशे, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, शास्त्रज्ञ तुषार आंबरे, रत्नागिरीचे पणन मंडळ उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, सेवा पुरवठादार संस्था प्राईम मूव्ह शिरीष तरखडकर, पालघर कृषी संशोधन केंद्राचे प्रा. ढाणे, कोस्बाद्चे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ सुहास सहाणे, अकोला येथील सर्ग विकास समिती चे प्रतिनिधी विनोद नमके, अग्रणी बँक व्यवस्थापक अभय पाटील या नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. उत्पादक ते ग्राहक मालाचे थेट विक्री केंद्र देखील याठिकाणी असेल, अशी २० केंद्रे राहतील. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या महोत्सवास यावे म्हणून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.

* शेतकऱ्यांचा गौरव करणार

जिल्ह्य़ातील कृषी, कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.