बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा आज वाढदिवस. कयामत से कयामत तक, राजा हिंदुस्तानी, थ्री इडियट्स यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा आमिर खान आज आपला ५४ वा वाढदिवस साजरा करतोय. यानिमित्ताने न्यूज विथ चाय सोबत जाणून घेऊयात आमिरबद्दलच्या काही खास गोष्टी-

* आमिर खान भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचा नातेवाईक आहे.

* आमिरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान असे आहे.

* आमिरने १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या त्याच्या काकांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. या सिनेमात आमिर पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसून आला होता व त्यावेळी त्याचे वय ८ वर्षे होते.

* आमिरला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे. आजही सिनेरसिकांच्या मनावर या सिनेमाची व त्यातील गाण्यांची जादू आहे. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाचं बजेट कमी असल्यामुळे आमिर दुसऱ्या एका व्यक्तीसोबत रिक्षा व बस या वाहनांवर या चित्रपटाचे पोस्टर्स लावत असे.

* ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या यशानंतर आमिरने मारुती 800 ही नवीन कार खरेदी केली. यासोबतच त्यावेळी तो आपल्या आई-वडिलांसोबत ज्या इमारतीत राहत होता त्याच इमारतीत एक फ्लॅटही विकत घेतला. 

* आपल्या काळातल्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केलेल्या आमिरची खरी जोडी जमली ती जुही चावलासोबत. या दोघांनीही एकूण ७ चित्रपटांत एकत्र काम केले ज्यातील ५ सिनेमे फ्लॉप झाले. आमिरने एकदा ‘इश्क’ या सिनेमाच्या सेटवर गमतीने ही गोष्ट जुही चावलाला सांगितली व तेव्हापासून आत्तापर्यंत कधीही त्या दोघांनी एकत्र काम केलेले नाही.

* अनेक तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आमिरचे ‘कन्हैयालाल’ हे टोपणनाव आहे. लहानपणी आमिर मुलींसोबतच अधिक खेळत असे व त्याच्याभोवती मुलींचाच गराडा असे. म्हणून आमिरच्या कुटुंबीयांनी त्याचे प्रेमाने कन्हैयालाल असे नाव ठेवले.

* ‘तारे जमीन पर’ या सिनेमात आमिरला अभिषेक बच्चनचे उदाहरण द्यायचे होते. त्याकरिता त्याने खास बिग बींकडून परवानगी घेतली होती.

* आमिरने अभिनेता न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं अशी त्याचे वडील झाकीर हुसेन व आई झीनत यांची इच्छा होती. मात्र आमिरने हायस्कुलनंतर आपले शिक्षण थांबवले.

* बॉलिवूडच्या या मि. परफेक्शनिस्टने ‘गुलाम’ या सिनेमातील भूमिकेत परफेक्ट दिसावं यासाठी बरेच दिवस आंघोळ केली नव्हती.

* ‘डर’ या सिनेमासाठी आधी आमिर खानची निवड करण्यात आली होती. मात्र आमिरने हा सिनेमा नाकारला व याचे कारण होते की, या चित्रपटाचे दिगदर्शक यश चोप्रा यांनी आमिर व अभिनेता सनी देओल या दोघांना एकत्रितच या चित्रपटाची कथा सांगावी अशी आमिरची इच्छा होती. यानंतर ‘डर’ मध्ये आमिरची भूमिका शाहरुख खानने साकारली.

* खूप कमी लोकांना माहित आहे की, अक्षय-कुमार व ट्विंकल खन्ना यांच्या विवाहसोहळ्याचे संपूर्ण व्हिडीओ शूटिंग आमिर खानने केले होते.

*  लंडनच्या मॅडम टुसॉड्स या व्हॅक्स म्युझियममध्ये आमिर खानचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार होता, मात्र आमिरने त्यास नकार दिला.