कल्याण लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने सेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील असणार आहेत. सेनेतर्फे गेल्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंनी मोठी मजल मारत सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येत विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे निवडणुकीसाठी उभे होते. या वेळेस राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभेसाठी असमर्थता दर्शविल्या नंतर ठाणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी तर्फे आनंद परांजपे यांना ठाण्याचे तिकीट देण्यात आले आणि त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना कल्याण लोकसभेसाठी ‘उभे’ करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदार संघात तसे पाहता सेना – भाजप युतीचे प्राबल्य असून विद्यमान खासदारांना पराभूत करण्याचे मोठे आव्हान बाबाजी पाटील यांच्या समोर असणार आहे. असे असले तरीही राष्ट्रवादीतर्फे मोठ्या तडफेने प्रचार होतांना दिसत येत नसून लढाईच्या आधीच राष्ट्रवादीने तलवार म्यान केली का ? असा प्रश्न लोकांना पडला आहे. कल्याण – अंबरनाथ नगरपालिकेत युतीची सत्ता असून सेनेची मोठी पकड या भागात दिसून येते.

प्रतिक्रिया

सेनेचे खासदार भेट देतात.
आताच रामनवमीला विद्यमान खासदारांनी आमच्या गावात भेट दिली होती, आपल्या कार्यकाळात अनेक वेळा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमच्या भागात भेटी देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास मदत केली आहे. आताच्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास माझ्या माहितीनुसार आमच्या भागात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटीलांनी अजून भेट दिली नाहीये.
– सुशांत मोहपे (चिखलोली, अंबरनाथ)

उमेदवार कोण हे बॅनर मधूनच कळाले.
गेल्या वेळेस माजी खासदार हे राष्ट्रवादीतून तर सेनेतर्फे शिंदेंना उमेदवारी देण्यात आली होती, प्रचाराची धामधूम आणि परिचयाचे चेहरे या मुळे २०१४ च्या निवडणुकीतील उमेदवारांबद्दल सगळ्यांना कमीत कमी तोंड ओळख होती परंतु आताची परिस्थिती वेगळी असून राष्ट्रवादीचे उमेदवार हे आमच्या भागात तरी कोणाच्याही परिचयाचे नसून अजून त्यांनी आमच्या भागात भेटही दिलेली नाही. मुळात बाबाजी पाटील यांचा फोटो पहिल्यांदा बॅनर वरच बघितला.  
-गुलशन कुमार (बुआपाडा, अंबरनाथ)

दुसरे उमेदवार कोण हे सुद्धा माहिती नाही
सध्या आमच्या भागातील परिस्थिती ही आहे कि येथील कोणत्याही नागरिकांना सेनेचे श्रीकांत शिंदे सोडून दुसरे कोण उमेदवार आहेत हे सुद्धा माहित नाहीत. त्यामुळे बाबाजी पाटील यांबद्दल कोणालाच कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. 
– सुशील जैसवार (वॉर्ड क्र ८ अंबरनाथ)  

नक्की माहिती नाही.
बाबाजी पाटील हे ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने त्यांचा आमच्या भागाशी सहसा कधी संबंध आला नाहीये त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये आणि निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना सुद्धा अजून पर्यंत राष्ट्रवादीच्या एकही पदाधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने उमेदवार कोण हे नक्की माहिती नाहीत.
– सुदीप शेजवळ (जांभूळ)