उत्सूकता लागून राहिलेल्या लोकसभेचा निकाल अखेर लागला.या निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार म्हणून केलेल्या प्रचाराने मतदार राजाला भुरळ घालण्यात येत होती. त्यामुळे राजन विचारे निवडून येतील; मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांचा फरक यंदा कमी होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती.

मोदी लाट नसतानाही राजन विचारे यांनी आघाडीचे आनंद परांजपे यांचा तब्बल ४ लाख १२ हजार १४५ मतांनी सहज पराभव केला. मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या विजयामुळे आघाडीची प्रचाराची यंत्रणा व घेतलेले मुद्दे कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले. मात्र या विजयाने नवी मुंबईतील सेना व भाजपाला येत्या विधानसभेच्या दृष्टीने बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. तर नवी मुंबईतून मिळालेल्या तब्बल ८४ हजारांच्या मताधिक्याने गणेश नाईकांचा करिष्मा चालला नसल्याचे दिसून आले आहे.

१९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्याने विविध प्रसिद्धी माध्यमांनी एक्झिट पोल दाखवून त्यात भाजप बहुमताने सरकार येईल असा अंदाज वर्तवला होता. तेव्हापासून भाजप सेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. समाज माध्यमांवर शुभेच्छांचे वर्षाव केले जात होते. मात्र तरीही ठाणे लोकसभेत विचारे यांचा विजय सुनिश्चित मानला जात असला तरीही स्थानिक पातळीवरील मतांच्या गणितांवरून काटे की टक्कर होईल असे मानले जात होते. मात्र विद्यमान खासदार असल्याने विचारेंकडे ठाणे लोकसभा मतदार संघात मोडणाऱ्या नवी मुंबई, ठाणे व मीरा भाईंदरमध्ये काम केल्याची जंत्री होती. त्याचा पद्धतशीर प्रसार सेना व भाजपच्या वतीने करण्यात आला. तर राष्ट्रवादीकडून मात्र आनंद परांजपे यांचा सुशिक्षित उमेदवार या पलीकडे प्रचाराचा मुद्दाच उरला नव्हता. त्यात देशभरात नरेंद्र मोदी यांचा देशातील प्रभाव व त्यांच्यासमोर देशातील कोणत्याही विरोधकांचा नसलेला सक्षम उमेदवार त्यामुळे युतीसाठी ही जमेची बाब होती. ठाणे जिल्ह्यात गणेश नाईकांच्या मार्गदर्शनांनुसार आघाडीचे सूत्र ठरवले जाते.

त्यानुसार ही निवडणूक काहीही करून जिंकायची या उद्देशाने शरद पवारांनी कंबर कसली होती. गणेश नाईकांचे नाव पुढे होते. मात्र नाईकांनी माघार घेतल्याने एकप्रकारे राजन विचारे यांचा विजय पक्का मानला जात होता.त्यात आनंद परांजपे यांना उभे केल्याने ब्राम्हण समाजाची मते फोडण्याची राष्ट्रवादीची खेळी देखील या निकालातून फोल ठरली. शिवसेनेला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीची कास धरणाऱ्या परांजपेविरोधात कट्टर शिवसैनिकांनी त्वेषाने काम केल्याचे बोलले जाते. हाच त्वेष नवी मुंबईत दिसून आला. भाजप व सेनेच्या दिलजमाईनंतर कोणत्याही भागातून मते फुटणार नाहीत याची काळजी घेतली गेली. अनेकवेळा नवी मुंबईत गणेश नाईकांना मदत केल्याचा आरोप अनेक सेनेच्या नगरसेवकांवर केला जतो. मात्र त्याच नगरसेवकांनी आपल्या प्रभागातून भरघोस लीड देत विचारे यांचा विजय पक्का केला. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही नवी मुंबईतून ४५ हजारांचा लीड विचारे यांना मिळाला होता.मात्र यंदा मोदी लाटेची वाच्यता नसताना नवी मुंबईतून तब्बल दुप्पट म्हणजे ८४ हजार मतांचा लीड देऊन भाजप व सेनेनी नवी मुंबईत आपली वाढलेली पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीपूर्वी गणेश नाईकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर येथे आनंद परांजपे नाही तर गणेश नाईक उभा आहे असे छातीठोकपणे सांगितले होते. निदान पराभव होईल मात्र तो कमी मतांनी अशी आशा सर्वानाच होती. मात्र नवी मुंबईतून मिळालेले युतीला मिळालेले लीड म्हणजे राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. मागील विधानसभेत गणेश नाईकांना निसटत्या परभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी मोदी लाटेचा परिणाम असे या पराभवाचे कारण देण्यात आले होते. मात्र यंदा राष्ट्रीय राजकारणात मोदींना विरोधकांनी जेरीस आणले होते. त्यात नवी मुंबईत परांजपे यांना लीड मिळवून देऊन नाईकांकडून विधसनसभेची तयारी सुरू असल्याचे बोलले जात होते.मात्र कालच्या निकालाने सर्वच बांधलेल्या अराखाड्यांवर पाणी फेरले गेले आहे. त्यात नाईक समर्थकांनी देखील झोकून देऊन काम केले नसल्याचे अनेक भागांत उघड झाले आहे.कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवून अनेक नेते फक्त रॅलींमध्ये दिसत होते. त्यात ऐरोली विधानसभा मतदार संघ गुंतागुंतीचा बनलेला आहे. आ.संदीप नाईकांना ही वाटचाल कठीण असल्याचे बोलले जात असताना ऐरोली मतदार संघातून मिळालेला सर्वाधिक लीड राष्ट्रवादीचे डोळे उघडणारा ठरला आहे.त्यात विधानसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सेना भाजपचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता जाणकार बोलून दाखवत आहेत.

राजन विचारे
ईव्हीएम मते -: ७,३८,६१८पोस्टल  मते -: २३५१एकूण मते-: ७,४०,९६९
आनंद परांजपे

ईव्हीएम मते -: ३,२८,०८८पोस्टल  मते -: ७३६एकूण मते-: ३,२८,८२४
राजन विचारे ४,१२,१४५ मतांनी विजयी

# ऐरोली विधानसभा मतदार संघ
राजन विचारे-:१,०७,६७६
आनंद परांजपे-:६३,३१३
राजन विचारे यांना ४४,३६३ मतांची आघाडी

# बेलापूर विधानसभा मतदार संघ
राजन विचारे-:१,०३,१६४
आनंद परांजपे-:६३,४४०
राजन विचारे यांना ३९,७२४ मतांची आघाडी
संपूर्ण नवी मुंबईतून  विचारे यांना ८४,०८७ मतांची आघाडी