पालिका खर्च करणार तब्बल १५४.३४ कोटी रुपये

नवी मुंबई महापालिका शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १४३९ कॅमेरे लावणार आहे. यासाठी तब्बल १५४.३४कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याआधी पालिकेने २०१२ मध्ये ५४ ठिकाणी २१२ कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र ते अपुरे पडत होते. अनेक नगरसेवकांनी देखील स्वखर्चाने कॅमेरे आपल्या प्रभागात लावले आहेत. मात्र नगरसेवकांची वाढती मागणी व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पालिकेने अतिरिक्त अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी सूचना करत मंजुरी दिली.

नवी मुंबई शहर हे पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. तर स्वच्छतेत अग्रेसर असताना राहण्याजोग्या शहरात नवी मुंबईचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईला लागून असलेले समुद्र किनारे पाहता घातपाती कारवाईची भीती नवी मुंबई शहराला आहे. त्यात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत पालिकेने पोलिसांशी समन्वय साधत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण पालिका व पोलिसांकडे जमा होणार आहे. त्यामुळे पोलिसांना घडलेल्या गुन्ह्याची उकल होण्यात व पालिकेला समस्येवर तोडगा काढण्यास होणार आहे.

ऐरोली-मुलुंड ब्रिज, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोलनाका, किल्ले गावठाण व बेलपाडा या प्रवेशद्वारांवर तसेच सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर महामार्ग, पामबीच मार्ग, उद्याने, मैदाने अशा ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत.

यामुळे शहरात येणाय्या प्रत्येक वाहनाची माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. याशिवाय सर्व चौकांमध्ये व रहदारी असलेल्या ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

कॅमेरे बसवण्याच्या कामांत अनेक कामांचा समावेश केलेला आहे

** हाय डेफिनेशन कॅमेरे ९५४
** पिटीझेड कॅमेरे ३९६
** वाहनांची गती देखरेख स्पिडिंग कॅमेरे ८०
**खाडी किनारे देखरखीकरिता थर्मल कॅमेरे ९
** पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा ४३ ठिकाणी
**सार्वजनिक घोषणांकरिता १२६ ठिकाणी
**डायनॅमिक मेसेजिंग साईनचा वापर ५९ ठिकाणी
**स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख
**व्हिडीओ सरविलेन्स मॅनेजर
** कमांड कंट्रोल संगणक प्रणाली
**डेटा सेंटर
**सर्व्हर ( यात तीस दिवसांचा डेटा सेव्ह असण्याची क्षमता)
**५ वर्ष लिझ लाईन खर्च समावेत
** ५ वर्ष देखभाल दुरुस्ती

सदस्यांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही जणांनी राजकीय भाषण केले मात्र हे राजकीय व्यासपीठ नाही हे लक्षात ठेवावे. सर्वच क्षेत्रात नवी मुंबई चांगले असताना सुरक्षेच्या दृष्टीने देखील चांगले व्हावे. महापौर
जयवंत सुतार

२०१२ मध्ये ५४ लोकेशन २१२ कॅमेरे बसवण्यात आले. २२ कोटी ७ वर्षांत खर्च केला. पोलिसांना त्याचा फायदा झाला. मागील दोन बजेटमध्ये सीसीटीव्हीची मागणी होत आहे. यंदा ५३० लोकेशन निवडले आहेत. त्यापैकी १०६ लोकेशन पोलिसांच्या सहकार्याने निवडले आहेत. बाकी सर्व लोकेशन्स नगरसेवक व पलिकेच्या सर्वेनुसार निवडले आहेत. हे कॅमेरे सर्व उद्याने, शाळा परिसरात लावण्यात येणार आहेत.बस डेपो, तलाव,११५ चौक, सर्व पालिका विभाग कार्यालये, इतर महापालिकांशी तुलना करूनच हे कॅमेऱ्याचा खर्च तपासण्यात आला आहे.
आयुक्त डॉ. रामास्वामी एन.

फेब्रुवारीला हा प्रस्ताव आला होता.मात्र चार महिने हा प्रस्ताव का थांबवला. प्रत्येक कॅमेरा किती रुपयांना मिळणार याची माहिती यात नाही. इलेक्शनसाठी हा प्रस्ताव हेतुपूर्वक आणण्यात आला आहे. हा अपूर्ण प्रस्ताव फेटाळावा. किशोर पाटकर
शिवसेना, वाशी

आरोप करताना नगरसेवकाने कोणावर करत आहात याचे भान विरोधकांनी ठेवावे. सीसी टीव्ही काळाची गरज होती. गार्डन, मैदाने, धार्मिक स्थळे, मार्केट ही ठिकाणे सुरक्षित होणार आहेत. हे स्वागतार्ह आहे. शहरासाठी महत्वाचा प्रस्ताव आहे.
सुरज पाटील
राष्ट्रवादी, नेरुळ

कोणत्या मार्केटमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत ते सांगावे. मच्छीमार्केट व भाजी मार्केटमध्ये कॅमेरे लावण्यात यावेत.
रामचंद्र घरत
भाजप, तुर्भे

गावठाणात कॅमेरे लावावेत. याआधी कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र त्यापैकी अनेक कॅमेरे बंद पडले आहेत.
ज्ञानेश्वर सुतार नेरुळ, शिवसेना

धार्मिक स्थळाजवळ कॅमेरे बसवण्याची गरज आहे. गावठणात हजारो नागरिक राहतात. खूप गुंतागुंतीचे भाग गावठाणात आहेत. तिथे कॅमेरे लावणे गरजेचे आहे.
सोमनाथ वासकर, शिवसेना, सानपाडा

नगरसेवकांना विचारावे की त्यांच्या प्रभागात कुठे कॅमेरे लावावेत. ज्या खासगी वास्तू आहेत त्यांनी स्वतः कॅमेरे लावावेत. पालिकेने तेथे कॅमेरे लावून पैसे खर्च करू नये.
अविनाथ लाड
वाशी, काँग्रेस

उद्यानात व मैदानात कॅमेरे लावावेत.तसेच खरोखर जिथे गरज आहे तिथेही लावण्यात यावेत.
रंगनाथ औटी
नेरुळ शिवसेना

साडे तीन वर्षांपासून पत्र व्यवहार केले आहेत. हा प्रस्ताव फेटाळू नये. चांगला व गरजेचा प्रस्ताव आहे. ग्रंथालय व अभ्यासिकेत कॅमेऱ्याची गरज आहे.
रुपाली भगत
नेरुळ, राष्ट्रवादी

चैन स्नॅचिंगचे प्रकार घडत आहेत. महिलावर्ग भयभीत झालेला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सुनीता मांडवे
नेरूळ ,शिवसेना

शहरातील फक्त चौकातच कॅमेरे का लावण्यात येणार आहेत. त्याचा नागरिकांना किती फायदा होणार? रहिवाशी भागात कॅमेरे लावण्याची गरज आहे. देखभाल दुरुस्तीचे काम नावीब कंपनीला द्यावे. नामदेव भगत
नेरुळ, शिवसेना