नेरुळ पश्चिमेला असलेल्या स्थानकाच्या बाजूला पदपथांची दुरुस्ती करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्च करून अडथळा विरहीत, मजबूत व सुसज्ज असे पदपथ तयार करण्यात आले आहेत. यामुळे शहरांतर्गत भागाची शोभा वाढणार आहे मात्र हे पदपथ नक्की कोणासाठी नागरिकांसाठी की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे.

नेरुळ पश्चिमेस स्थानकाच्या बाजूला असलेला पदपथ हा संपूर्ण फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. सध्या नेरुळ येथील मच्छी मार्केटचा प्रश्न प्रलंबित असल्याने या पदपथांच्या बाजूलाच असलेल्या भागात मच्छीमार बसलेले आहेत. मात्र या मच्छीमारांखेरीज अनके फेरीवाल्यांनी या जागेत अतिक्रमण केले आहे. तर या पदपथाच्या दोन्ही बाजू फेरीवाल्यांनी हडप केल्या आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस रेल्वे स्थानक परिसर असल्याने येथे तोबा गर्दी असते. फेरीवाले आपले बस्तान या पदपथांवर मांडून बसलेले असतात. अनेक फेरीवाले पदपथाच्या बाजूला असलेल्या महत्वाच्या रहदारीच्या मार्गावर आपल्या हातगाड्या घेऊन उभे असतात. त्यामुळे सतत या मार्गावर सायंकाळच्या वेळेस रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या ठिकाणी दाखवण्यासाठी कारवाई केली जाते. मात्र गाडी गेल्यावर परिस्थिती पूर्वीसारखी होते. त्यामुळे पालिकेची कारवाई देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर नागरिक देखील कारवाईच्या या दिखावेपणावर बोट ठेवू लागले आहेत. पालिकेतर्फे पहिल्या टप्प्यातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले आहे. मात्र सर्वेक्षण होण्याआधी या पदपथावर बसणारे फेरीवाले व सद्य स्थितीत असलेले फेरीवाले यांत अचानक वाढ झालेली दिसून आली आहे. एकमेकांना खेटून येथे फेरीवाले बसलेले दिसत आहेत. त्यामुळे पालिका शहरातील नागरिकांसाठी बनवत असलेले अडथळा विरहित पदपथ हे नक्की कोणासाठी असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. नागरिकांना दररोज फेरीवाल्यांचे अडथळे पार करावे लागत आहेत. त्यातच भाजीपाला व इतर पदार्थांमुळे या परिसराला गलिच्छपणा आलेला आहे. त्यातच फेरीवाले स्थानकाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भागात उरलेला भाजीपाला टाकत असल्याने येथे कचरा पडून दुर्गंधी सुटू लागली आहे. या पदपथांमुळे नेरुळमधील भागाच्या सौंदर्यात भर पडणार असली तरी एकंदरच येथील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हे पदपथ फक्त कागदावरच उरणार असल्याचे दिसत आहे. नागरिकांना मात्र रस्त्यावरूनच चालणे भाग पडणार आहे. त्यामुळे पालिकेची कल्पना नागरिकांच्या उपयोगात न येता फेरीवाल्यांना मात्र समांतर पदपथ व्यवसाय करण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे नेरुळकरांना धोकादायकरित्या सायंकाळच्या वेळेस रस्त्यावरून चालावे लागणार असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पालिकेने याबाबत ठीक भूमिका घेऊन हे पदपथ नागरिकांना खुले करून देणे गरजेचे बनलेले आहे.

उच्च न्यायालयाने शाळा, रुग्णालय, स्थानकांच्या १५० मीटर आजूबाजूला फेरीवाल्यांना बसता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचा आदेश मानून पालिकेने अंमल बजावणी करत नेरुळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला १५० मीटर अंतरावर नो फेरीवाला झोन असे फलक लावले आहेत. मात्र पालिकेची ही फक्त औपचारिकता दिसून येत आहे. कारण फलक लावूनही नेरुळ स्थानकाला लागून असलेल्या या पदपथावर फेरीवाले बसलेले दिसून येत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा पालिकेकडून अवमान केला जात आहे.

नेरुळ रेल्वे स्थानकातून मीही रोज ये-जा करतो. येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असल्यामुळे थोडीसुद्धा जागा चालण्यास मिळत नाही. नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. त्यातच रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी दररोज ठरलेली असते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढतेच मात्र कर्णकर्कश्श हॉर्न वाजवले जात असल्यामुळे प्रचंड त्रास होतो. त्यातच पालिका आता हे पदपथ सुधारवत आहे. मात्र हे पदपथ नागरिकांसाठी द्यावेत. एकाही फेरीवाल्याला येथे बसून देऊ नये. त्यामुळे बकाल व गलिच्छ स्वरूप या परिसराला आले आहे.
(योगेश तांबे नेरुळ नागरिक)