बस डेपो समोरील अज्ञाताने तोडली ७ झाडे
सीबीडी पोलीस स्थानकाससमोर घडला प्रकार

संपूर्ण जग पर्यावरण दिन साजरा करत असताना नवी मुंबईतील सीबीडीत मात्र झाडांचे शिरकाण करण्यात आले आहे. ४ जून रोजी अज्ञातांकडून सीबीडी सेक्टर ३ बस डेपो समोर पदपथावर असलेली झाडेच तोडली.मुख्य म्हणजे  बस डेपोच्या समोरच सीबीडी पोलीस  ठाणे असतानाही ही झाडे तोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.         

सीबीडी बस डेपोच्या पदपथावर व डेपोत असलेली सात झाडे अज्ञाताने ४ तारखेच्या मध्यरात्री करवतीने कापल्याची घटना उघडकीस आली आहे. बस डेपोच्या बाजूला असलेल्या रिक्षा संघटनेच्या वतीने ५ वर्षांपूर्वी हे वृक्षारोपण करण्यात आले होते. दररोज हे रिक्षाचालक न चुकता झाडांना पाणी घालून त्यांची देखभाल करत होते. ४ तारखेच्या मध्यरात्री अज्ञाताने ही झाडे करवतीने कापली. मात्र रात्री तिथून जात असलेल्या एका रिक्षा चालकाच्या नजरेस ही बाब दिसताच त्याने या अज्ञाताला हटकताच त्याने तिथून पळ काढला. अन्यथा या ७ झाडांसोबत डेपोत असणारी इतरही झाडे कापली गेली असती अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पूर्ण वाढ होत आलेली झाडे कापल्याने रिक्षा चालकांसह पर्यवरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. पर्यावरण दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना भावी पिढीला पर्यवरणाचे महत्व  समजावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. त्यात नवी मुंबई महापालिकेकडून देखील प्रयत्न केले जात आहेत. नवी मुंबईत वेगाने विकास होत असताना सिमेंटचे जंगल वाढत असताना पालिका, राजकीय व सामाजिक व पर्यावरणवादी संघटनांकडून झाडे लावण्यासाठी व ती जपण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

एकाबाजूला या झाडांची कत्तल झालेली असताना पर्यावरण दिनानिमतत पोलीस स्थानक परिसरात नवी रोपे लावण्यात येत असल्याने विरोधाभासाचे चित्र पाहायला मिळाले.

पालिकेला ही बाब समजताच पालिकेकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांनी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ही झाडे आम्ही तीन वर्षांपूर्वी लावलेली होती. चांगली वाढलेली झाडे तोडण्यात आली आहेत. या झाडांमुळे या भागात सावली पडत असल्याने दिवसभर उन्हात व्यवसाय करणारे रिक्षाचालक,नागरिक त्या सावलीचा  आधार घेत होते. ही झाडे खोडातूनच तोडल्याने वाढायला पुन्हा अनेक वर्षे जातील. यंदाच्या पावसाळ्यात ही झाडे टिकली असती.मात्र तरीही ही झाडे आम्ही टिकवण्याचा निर्धार केला आहे.
विष्णू दिघे रिक्षाचालक

ही झाडे लावून रिक्षा संघटनेने सामाजिक भान जपले होते. अज्ञातांकडून झाडे तोडण्यात आल्याने सर्वच बाजूने संताप व्यक्त करण्यात येत आहे. बस डेपोत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून संशयित कोण आहे ते समोर येऊ शकते. मात्र पोलिसांनी संशयितांना पकडून कडक कारवाई करावी जेणेकरून पर्यावरणाचे भक्षक बनलेल्यांवर जरब बसेल.
(ललित बुंदेला शिवसेना उपशहरप्रमुख)