नवी मुंबईकर नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणा-या सुविधांचा दर्जा उत्तम राखण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे काटेकोर लक्ष असून खड्डेविरहित चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत यादृष्टीने अल्ट्राथीन व्हाईट टॅपींग काँक्रिट रस्ते बनविण्यात येत आहेत. शिरवणे व कोपरी गांव येथे प्रायोगिक स्वरुपात हे रस्ते बनविण्यात येत असून सेक्टर 1 शिरवणे मार्केट समोरील व्हाईट टॅपींग काँक्रिट रस्ते कामाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे व इतर अधिका-यांसमवेत पाहणी करून आवश्यक सुधारणांच्या सूचना केल्या.

अल्ट्राथीन व्हाईट टॅपींग काँक्रिटने रस्त्याची सुधारणा केल्यामुळे रस्त्याचे आयुर्मान 10 ते 15 वर्षे वाढणार असून यामुळे वारंवार रस्ते खराब झाल्याने दुरुस्ती करण्याची गरज भासणार नाही. या पध्दतीने रस्ते बनविण्याचा खर्चही तुलनेत कमी असून यामुळे खर्चात व वेळेत बचत होणार आहे. शिरवणे मार्केट परिसरात प्रायोगिक स्वरुपात बनविण्यात येत असलेल्या कामाची पाहणी करताना हे काम विहित वेळेत व कामाचा दर्जा राखून पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश दिले. शिरवणे व कोपरी गावात प्रायोगिक तत्वावर बनविण्यात येणा-या रस्त्यांप्रमाणेच इतरही गाव-गावठाण व गावठाण विस्तार भागात अल्ट्राथीन व्हाईट टॅपींग काँक्रिट रस्ते बनविण्यात येणार असून यामधून रस्त्यांची गुणवत्ता वाढ होणार आहे. तसेच रस्त्यांची आयुष्य वाढल्याने खर्चातही लक्षणीय बचत होणार आहे.