वाशी येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सायकल चालवण्यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहे. परंतु हे सायकल ट्रॅक अनधिकृत पार्किंग चा अड्डा बनत असून नागरिकांना सायकल चालवण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकाच लेन वर सायकल ट्रॅक व टॅक्सी स्टँड फलक असल्यामुळे नागरिकांमध्ये या बाबत संभ्रम निर्माण झाला असून पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. महानगरपालिकेद्वारे शहरात विविध योजना राबवल्या जातात परंतु नंतर त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.

वाशी सेक्टर ९ येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल ते वाशी बसडेपो या सागर विहार रस्त्याला समांतर असा सायकल ट्रॅक पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. परंतु येथील वास्तविक परिस्थती काही वेगळेच चित्र दर्शवत आहे सायकल ट्रॅक वर सायकल नव्हे तर चक्क गाड्या उभ्या केलेल्या दिसत आहेत. शाळांना सुट्टी लागल्यामुळे मोठ्या संख्येने मुले व नागरिक येथे सायकलिंग करण्यासाठी येत आहेत. या अनधिकृत पणे होणाऱ्या पार्किंग मुळे सायकल चालवण्यासाठी अडथळे निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सायकल ट्रॅक वर गाड्या पार्किंग केल्यामुळे लहान मुले रस्त्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवत आहे या मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पटकन लक्षात येईल अशा प्रकारे फलक लावणे अपेक्षित असते परंतु नूर मस्जिद येथे बनवण्यात आलेल्या सायकल ट्रॅक च्या लेन  वर दोन सूचना फलक पालिकेद्वारे लावण्यात आले आहेत ज्यामधून एकावर सायकल ट्रॅक तर दुसऱ्या वर टॅक्सी स्टॅन्ड असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे येथे नेहमी संभ्रमाची स्तिथी निर्माण होत आहे.

पालिका आयुक्त रामस्वामी एन यांनी काही दिवसांपूर्वी सायकल ट्रॅकची पाहणी करताना  नागरिकांना पटकन लक्षात येईल अशा प्रकारे फलक सुधारणा करावी व ट्रॅकच्या पट्टयात पार्किंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु अधिकारी वर्गाने आयुक्तांनी दिलेल्या सूचना पायदळी तुडवलेल्या दिसत आहेत.