स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी महानगरपालिकेची जय्यत तयारी.

– NWC प्रतिनिधी

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ ला सामोरे जाताना स्वच्छ व सुंदर नवी मुंबईची प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरु केली असून स्वच्छता ही अभियानापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांची कायमस्वरुपी सवय व्हावी ही आयुक्तांची भूमिका आहे. त्यास अनुसरून हागणदारीमुक्त शहर (ओ.डी.एफ. फ्री) मानांकन उंचावत आता हागणदारीमुक्त डबल प्लस शहर (ओ.डी.एफ. डबल प्लस) म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेस मान्यता लाभलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शौचालये कायमस्वरुपी वापरण्यायोग्य सुस्थितीत असावीत या भूमिकेतून शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे व देखभालीकडे आयुक्तांनी विशेष लक्ष दिले देण्याचे सूचित केले आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आयुक्त करीत असलेल्या पाहणी दौ-यातही शौचालयांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्यामार्फत मौलिक सूचना करण्यात येत आहेत व त्याची अंमलबजावणी त्वरित करून त्याचाही आढावा घेण्यात येत आहे.

Aroli Setor 5 Chincholi Udyan Zen Garden

Vashi Bus Depot

महानगरपालिका क्षेत्रातील शौचालयांची स्थिती चांगली रहावी व त्यांचा वापर करू इच्छिणा-या नागरिकांस कोणत्याही प्रकारची अस्वच्छता जाणवू नये यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून शौचालयांच्या बाहेरील भागाचे सुशोभिकरण पी.पी.पी. तत्वावर लोकसहभागातून करून घेऊन त्या बदल्यात संबंधित कंत्राटदांरास शौचालयाच्या भिंतींवर तसेच वरील भागात जाहीरात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये कंत्राटदारामार्फत ५०२ सार्वजनिक व सामुदायिक शौचालये तसेच ई-टॉयलेट यांच्या बाह्य भागात आकर्षक रंगरंगोटी केली जाणार असून शौचालयाच्या बाहेरील भागाचे व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. यामुळे शौचालयांना रंगरंगोटी करण्याच्या महानगरपालिकेच्या खर्चात लक्षणीय बचत होणार आहेच शिवाय संबंधित कंत्राटदारास शौचालयांवर जाहिरातीसाठी जागा उपलब्ध होणार असल्याने कंत्राटदाराकडून महानगरपालिकेस ५ वर्षात ४२ लक्ष इतकी रक्कम मिळणार आहे. अशाप्रकारे यामधून महानगरपालिकेचा अर्थात एकप्रकारे नागरिकांचाच दुहेरी लाभ होणार आहे.  आत्तापर्यंत ३५० शौचालयांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून ५० शौचालयांसमोरील परिसरात मन प्रसन्न करणारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या शौचालयांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलला असून नव्या स्वरूपाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Jijamata Nagar Ghansoli

Vashi sector 1

नवी मुंबई हे शहर पनवेल – पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली अशा नजिकच्या शहरांना जोडणारे अत्यंत महत्वाचे शहर असून दररोज लाखो लोक नवी मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त ये-जा करीत असतात. त्यामुळे या सर्व नवी मुंबईतील अतिथींसाठी त्याचसोबत येथील नागरिकांसाठी ५०० हून अधिक सार्वजनिक व सामुदायिक शौचालये नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली आहेत. या शौचालयांचा वापर करताना कुठल्याही प्रकारे अस्वच्छता वाटू नये, दुर्गंधी जाणवू नये व त्यांची स्थिती नियमितपणे चांगली असावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे विशेष लक्ष असून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची दैनंदिन साफसफाई व्यवस्थित रहावी तसेच त्यांची देखभाल व दुरूस्ती योग्य प्रकारे आणि नियमित व्हावी या दृष्टीने शौचालयाशी संबंधित सर्व कामे एकाच कंत्राटदारामार्फत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शौचालयांची स्वच्छता व त्यांची देखभाल-दुरुस्ती यावर योग्य नियंत्रण राहून नागरिकांना नेहमीच चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.हागणदारीमुक्त शहराचा लौकिक कायमस्वरूपी असावा यादृष्टीने शहरातील शौचालयांच्या सुस्थितीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेमार्फत संबंधितांना देण्यात आले असून शहर स्वच्छतेचा वसा जपण्यासाठी महापालिका कार्यरत आहे.