सिडकोचा आपत्ती नियंत्रण कक्ष आज 1 जून 2015 पासून यशस्वीरित्या कार्यान्वित झाला आहे. सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सिडको अधिकारक्षेत्रात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तिच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि संभाव्य वित्त व मनुष्यहानी  टळावी यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून तो दि. 1 जून 2015 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत कार्यान्वित राहणार आहे.

उद्घाटनानंतर डॉ. सरवदे यांनी संपूर्ण कक्षाची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आपत्ती नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी चर्चा केली व त्यांना आवश्यक सूचना दिल्या.

सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर उघडण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहील. मुख्य आपत्ती नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. एस. ए. नाडगौडा यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील.

आपत्ती प्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी सिडकोने पुढील उपाययोजना केली आहे. 

  1. आपत्ती नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 61054540
  2. दुर्घटनास्थळाचे छायाचित्र वॉट्सॲपवर पाठविण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8879228896
  3. तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी म्हणून ॲम्ब्युलन्स सेवाही पुरविण्यात येणार आहे.

आपत्कालीन कक्षाद्वारे खालील तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे – 1) वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, 2) रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे सुरक्षित करणे, 3) पुर/पुरसदृश्य स्थिती, 4) रस्त्यांची दुरावस्था, 5)  रोड व नाल्याजवळील साचलेला कचरा, 6) व्यक्तिंचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, 7) आग व आगीचे विविध प्रकार, 8) साथीचे रोग 9) विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, 10) इमारत कोसळणे, 11) भूस्खलन होणे.

अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री 24 तास उपलब्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपत्कालीन स्थितीची माहिती सिडको आपत्ती नियंत्रण कक्षास ताबडतोब द्यावी असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.