आज ख्रिसमस!  ख्रिसमस म्हटलं कि डोळ्यांसमोर येतो तो आपल्या पोटलीतून छोट्यांसाठी चॉकलेट्स आणि आकर्षक भेटवस्तू घेऊन येणारा सांताक्लॉज, घराघरांमध्ये सजवलेले आकर्षक ख्रिसमस ट्री, स्नो मॅन, आकाशकंदील, आकर्षक गिफ्टस् तसेच विविध प्रकारचे केक्स, कुकीज, पेस्ट्रीज, चॉकलेट्स!

मागील काही वर्षांपासून बरेचसे सण हे एका विशिष्ट धर्म किंवा समाजापुरते मर्यादित ना राहता सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. उदाहरणार्थ, गणपती, नवरात्र, दिवाळी हे सण त्या त्या धर्म वा समाजापुरते मर्यादित राहिलेले नसून इतर धर्मीयसुद्धा ते उत्साहाने साजरा करताना व त्यात सहभागी होताना दिसून येतात. याच सणांच्या यादीत सामिल झालेला सण म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ! गेल्या काही दिवसांपासूनच घराघरांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या कॅरॉल सिंगिंगमधून तसेच सांताक्लॉज, चर्च व घरांची सजावट, भेटवस्तू, केक व इतर खाद्यपदार्थांच्या खरेदीवरून ख्रिसमसचा उत्साह पाहावयास मिळत आहे.  वाढत जाणाऱ्या थंडीसोबत साजऱ्या होणाऱ्या नाताळचा उत्साह फक्त भारतातच नाही तर जगभरात दिसून येत आहे. मुंबई व  उपनगरांमधील चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून तेथे ख्रिस्ती बांधवांची अलोट गर्दी उसळली आहे. आज ख्रिसमसनिमित्त दुकाने, बाजारपेठा, रस्ते ख्रिसमस ट्री, सांताच्या लालचुटूक टोप्या, घरसजावटीचे साहित्य, आकर्षक भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स अशा अनेक वस्तूंनी सजल्या आहेत. शहरांतील मॉल्समध्येही ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया या ख्रिसमस सेलिब्रेशनबद्दलच्या काही खास गोष्टी.

* सिक्रेट सांता – ख्रिसमस साजरा करण्याची ही एक अनोखी पाश्चिमात्य संकल्पना आहे. ख्रिसमसच्या काही दिवस आधीपासूनच सिक्रेट सांताच्या सेलिब्रेशनला सुरुवात होते. यात आपल्या नातलगांना, मित्रमंडळींना त्यांच्या नकळत भेटवस्तू देऊन ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या जातात. नाताळ हा सण म्हणजे आनंद व प्रेमाची देवाणघेवाण करण्याचा उत्तम क्षण. म्हणूनच या सणाला आपल्या जवळच्यांना ही सिक्रेट भेटवस्तू, संदेश दिल्याने परस्परांमधील प्रेम, आस्था, आदर व आपुलकी वृद्धिंगत होते. हल्ली कॉलेज,कॉर्पोरेट ऑफिस याठिकाणी सिक्रेट सांताचे  सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात दिसून येते. या सिक्रेट सांताच्या सेलिब्रेशनसाठी खास छोटे-छोटे आकर्षक गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स दुकानांमध्ये, बाजारांमध्ये तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स वर उपलब्ध आहेत.

* ख्रिसमस ट्री व घराची सजावट:-  ख्रिसमसनिमित्त बहुतांश ख्रिस्ती बांधवांच्या घरी प्रभू येशूच्या जन्माचा देखावा साकार केला जातो. त्यासाठी गाईचा गोठा तयार करून त्यामध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या मांडल्या जातात. या देखाव्याला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. हल्ली येशूच्या जन्माचे रेडिमेड देखावेही बाजारापेठेत, दुकानांमध्ये मिळतात. ग्राहकांकडूनया रेडिमेड देखाव्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. घरसजावटीसाठी लहान, मध्यम व मोठया आकाराचे ख्रिसमस ट्री, स्नोमॅन, झालर, चांदण्या, सोनेरी रंगाच्या घंट्यांची माळ, आकर्षक शो पीस, एन्जल्स, चांदण्यांचे कंदील, डान्सिंग बाँल्स, भेटवस्तू , छोट्यांच्या लाडक्या सांताची  टोपी, मास्क, कपडे, चॉकलेट बॉक्स, ड्रम, रिबिन्स,झिरमिळ्या, बलून्स, हँगिंग मोजे, हेअरबँड आदींचा वापर करतात.

* चॉकलेट्स, केक्स आणि पेस्ट्रीज:- अस्सल खवय्यांसाठी ख्रिसमस हा सण म्हणजे एक पर्वणीच असतो. कारण या काळात बाजारात विविध प्रकारचे केक्स,चॉकलेट्स,पेस्ट्रीज,डेझर्ट्स,कुकीज यांची रेलचेल असते.  सध्या ख्रिसमसची खासियत असलेल्या प्लम केकची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमससाठी स्पेशल केक बनवले जातात. त्यात ख्रिसमस ट्री किंवा सांताक्लॉजची प्रतिकृती असलेल्या किंवा स्पेशल प्लम केकला जास्त पसंती दिली जाते. प्लम केकसह फ्रेश क्रीम, चॉकलेट ब्राउनी केक, रिअल प्लम, मिक्स फ्रुट केक, प्लम हनी केक, रिच प्लम केक असे वेगवेगळे प्रकार बाजारात पाहायला मिळतात. या विविध प्रकारच्या केक्सना ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केक आणि पेस्ट्रीजसोबतच वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स सध्या उपलब्ध आहेत.

विशेषतः नाताळसाठी ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज,जिंगल बेल अशा अनोख्या व आकर्षक स्वरूपामध्ये चॉकलेट्स बनवण्यात आली आहेत. तसेच काही दुकानांमध्ये होम मेड चॉकलेट्सही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाताळच्या काळात बेल्जीयम चॉकलेट,पायनॅपल चॉकलेट असे अनेकविध चॉकलेट्स खास ऑर्डर देऊन तयार करून घेतले जातात. ख्रिसमसच्या हटके सेलिब्रेशनसाठी अनेक बेकरीज, स्वीट मार्ट्स, चॉकलेट व केक शॉप्स आणि गिफ्ट शॉप्सनी अनेकविध व्हरायटी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबत ख्रिसमसचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून खास  वेगवेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स व डोनट्सही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच यावर्षीचा ख्रिसमस अधिक चवदार व खुमासदार होण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मफिन्सही तुम्ही ट्राय करू शकता.

आधी म्हटल्याप्रमाणे ख्रिसमस म्हणजे बऱ्याच खवय्यांसाठी पर्वणी असली तरी काही भाविक उपवासदेखील करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे व मांसाहारी पदार्थ आवर्जून केले जातात.