महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथी प्रमाणे जयंती आहे. स्वराज्यातील रयत सुखी कशी राहावी यासाठी नेहमीच काळजी घेणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल लिहावे वाचावे तितके कमीच आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीमुळे सागरी सुरक्षिततेचा महत्व लक्षात घेऊन आरमाराची स्थापना केली होती. आज त्यांच्या तिथी प्रमाणे असलेल्या जयंती निमित्त त्यांच्या आरमाराविषयी जाणून घेऊया.

२४ ऑक्टोबर १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडीवर स्वारी केली, जवळच असणाऱ्या कल्याण येथे शिवाजी महाराजांना काही जहाज मिळाली. या जहाजांना हस्तगत करून महाराजांनी आपल्या आरमाराची सुरुवात केली. स्वराज्याच्या आरमाराच्या बांधणीत इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक भंडारी तसेच आगरी व कोळी बांधवांना मोठी मदत केली.

त्या काळी आपल्या जहाजबांधणीच्या कौशल्यामुळे हिंदी महासागरात पोर्तुगीजांचे राज्य होते.  हेच लक्षात येत महाराजांनी जहाज बांधणीसाठी ‘रूथ लेताम व्हिएगस’ या पोर्तुगीज तंत्रज्ञाची मदत घेतली आणि २० नवीन जहाजे बांधण्याचे काम हाती घेतले. जहाज बांधणीच्या कामात पोर्तुगीज तंत्रज्ञासोबत सुमारे तीनशे कारागीर काम करत असत. शिवाजी महाराज आरमाराकडे विशेष लक्ष देत असल्याचे लक्षात येताच वसईच्या कॅप्टनने रूथ व्हिएगसला फितवले व एका रात्रीतच व्हिएगस सर्व कारागिरांना आपल्या सोबत घेऊन निघून गेला, तरी महाराजांनी डळमळून न जाता या तंत्रज्ञाच्या हाताखाली काम करणाऱ्या कारागिरांचा अनुभवाचा वापर करत ही बांधणी पूर्ण केली. आपले सागरी सामर्थ्य वाढावे यासाठी शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग सारखे किल्ले बांधले.  १६६३ साली राजापूर, मालवण, देवगड येथे ५० जहाजे बांधण्यात आली. भविष्यातील समुद्र सुरक्षेचा विचार करून बांधलेल्या आरमाराच्या सामर्थ्यावर शिवाजी महाराजांनी सुमारे शंभर सागरी मैलांपर्यंत पर्यंत आपले साम्राज्य वाढवले. यासोबत शिवाजी महाराजांनी १२ देशांसोबत सागरी व्यापार देखील सुरु केला होता. भारतातील नौदलाची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली होती. म्हणूनच शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते.