डोंगराची एक बाजू निसर्ग संपन्न तर दुसरी बाजू उजाड
उजाड बाजूमुळे राहिवाशांना होतोय वाढत्या तापमानाचा त्रास

नवी मुंबई शहरात काही मोजकीच ठिकाणे निसर्गसौंदर्य टिकवून आहेत. अन्यथा या शहराला सिमेंटचे जंगल  म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.या निसर्गसंपन्न मोजक्या ठिकाणांपैकी एक असलेल्या पारसिक हिलची एक बाजू हिरवीगार तर दुसऱ्या बाजूस मात्र उजाड अशी  अवस्था सध्या झालेली आहे. या उजाड बाजूस आगी लावण्याचे प्रमाण जास्त असल्याने पूर्ण वाढ झालेले वृक्ष होरपळून भकास डोंगर दिसू लागला आहे. त्यामुळे पालिकेपुढे या शहरातील नावाजलेल्या पारसिक हिलवर हिरवळ टीकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पारसिक हिल नवी मुंबईकरांचे आवडीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूस हिरवळ असल्याने श्रीमंतांनी येथे बंगले व इमारती, उभारल्या आहेत.राधेकृष्ण मंदिर या सौंदर्यात भर घालते.तर महापौर निवास या भागाला आपोआप प्रतिष्ठा मिळवून देते. थंडीत  व पावसाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असल्याने व उन्हाळ्यात येथील काहीसे थंड वातावरण व निसर्ग अनुभवण्यासाठी नागरिकांचे चालण्याचे आवडते ठिकाण बनले आहे.पारसिक हिलसारखे निसर्गसौंदर्य ठिकाण पालिका हद्दीत व शहराच्या मध्यभागी आहे.हे शहराचे भाग्य असताना मात्र पालिकेकडून या बाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. आगरोळी गावाच्या व आयकर कॉलनीच्या बाजूला असलेल्या या भागाला उजाड स्वरूप आले आहे. पावसाळ्यातील पाणी अडवून टीकवण्यासाठी कोणतीही व्यवस्था कित्येक वर्षांत केली गेली नसल्याने कडक उन्हात रोपे करपून जात आहेत. तर पूर्ण वाढलेले वृक्ष लावण्यात येणाऱ्या सततच्या आगीमुळे मरून गेले आहेत.

# माजी महापौरांची खंत
माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी महासभेत याविषयी बोलताना खंत व्यक्त केली होती. महापौर पदाच्या काळात त्यांनी लावलेली हजारो रोपे उद्यान विभागाला टिकवून ठेवता न आल्याने व पाण्याअभावी करपून गेल्याने त्यांनी सभागृहात उघड उघड संताप व्यक्त करून उद्यान विभागाला धारेवर धरले होते.

# महापौर निवासामुळे प्रतिष्ठा
प्रत्येक महापालिकेत महापौर व आयुक्त निवासाच्या वास्तू प्रतिष्ठेच्या समजल्या जातात.आयुक्त निवास नेरुळ येथील शहरी भागात असताना महापौर निवास या पारसिक हिलच्या हिरवळीवर उभारण्यात आले आहे.त्यामुळे पालिकेमार्फत येथील प्रतिष्ठा व महत्व ओळखून येथे हिरवळ जोपसण्यात आली आहे.मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या याच पारसिक हिलचा भाग मात्र उजाड पडत चालल्याने विरोधाभासाचे चित्र  निर्माण होत आहे. त्यामुळे या भागाला साप्तान वागणूक का असा प्रश्नही येथे चालण्यास येणाऱ्या नागरिकांकडून विचारला जात आहे.

# डोंगर उजाड झाल्यामुळे तापमानात वाढ
पारसिक हिलच्या बाजूस रहिवाशी भाग आहे. एका बाजूस आगरोळी गाव तर पारसिक हिलच्या पायथ्याशी आयकर कॉलनी वसलेली आहे. डोंगर उजाड झाल्याने अनेक ठिकाणी कातळ दिसतो. त्यामुळे कडक उन्हाळ्यात व वाढलेल्या तापमानात अधिक भर पडून या अधिकच्या तापमानाचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे या उजाड डोंगरावर हिरवळ फुलवण्याची व टिकवण्याची जबाबदारी पालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यास नागरिकांच्या व पर्यावरण प्रेमींच्या सोबतीची गरज लागणार आहे.

पारसिक हिलचा भाग महत्वाचा आहे.डोंगर माथ्याचा भाग असल्याने व कातळ असल्याने पाणी टिकत नाही.मात्र तेथे असलेल्या पाण्याच्या व्यवस्थेमधून कृत्रिम पद्धतीने पाणी झाडांना मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू.तसेच येत्या पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची निगा राखली जाईल.
(नीतीन काळे उपायुक्त उद्यान विभाग )

आगरोळी गावाच्या बाजूला व आयकर कॉलनी लगत याअसलेला पारसिक हिलचा भाग हिरवळी अभावी रया गेली आहे.या डोंगरावर कोणीही प्रवेश करू नये म्हणून तारांचे कुंपण किंवा भिंत उभारण्याची गरज आहे म्हणजे घसरणारी माती व दगड पडणार नाहीत. झाडे टिकून राहतील.दरवर्षी झाडे लावण्याचा कार्यक्रम केला जातो.मात्र पाण्याअभावी ती झाडे टिकत नाहीत. आगी लावल्या जातात. त्यामुळे पालिकेने ठोस उपाययोजना करून निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवावे.पालिका इतका खर्च रोपे लावण्यावर करते मात्र या भागात दुर्लक्ष होत आहे.
(सरोज पाटील स्थानिक नगरसेविका शिवसेना)