बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची बातच काही और असते. रोज त्यांच्याशी संबंधित कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा ही होतच असते. मग ते त्यांचे सिनेमे असो, प्रेमप्रकरण असो अथवा बिग बजेट विवाहसोहळे. यासोबतच या सेलिब्रिटींचे कपडे, ज्वेलरी, केशरचना यांपासून त्यांची आलिशान घरे, गाड्या, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू हेही त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. तसेच बऱ्याच वेळा काही सेलिब्रिटींना विशेषतः काही अभिनेत्रींना त्यांच्या जोडीदाराकडून मिळालेल्या महागड्या गिफ्ट्सची चर्चा बॉलिवुड वर्तुळात होत असते. आज आपण अशाच काही सेलिब्रिटी कपल्सबद्दल जाणून घेणार आहोत. 

* अजय देवगण – काजोल : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेली आणि प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी भारतातील प्रसिद्ध वास्तू म्हणजेच आग्र्याचा ताजमहाल. या ताजमहालाच्या सौंदर्याने भारतासोबतच जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली. त्यातच आणखी एका व्यक्तीची भर पडली आणि ती व्यक्ती म्हणजेच बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणची. अजयने पत्नी काजोलला ताजमहालाचे नक्षीकाम केलेली साडी भेट म्हणून दिली होती. काजोलने ही साडी परिधान केल्यानंतर तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. या साडीसोबतच अनेकांच्या नजरा खिळलेल्या त्या काजोलच्या ब्लाऊजवर. त्या ब्लाऊजवरील ताजमहालाची प्रतिकृती असलेल्या बारीक नक्षीकामामुळे या साडीला एक वेगळाच लूक मिळाला. एकंदरीतच ही साडी काजोलसाठी एक खास गिफ्ट ठरली हे नक्की!

* आमिर खान – किरण राव : हिंदी सिनेसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिर खानची प्रत्येक गोष्ट खास असते. त्यामुळेच आमिरच्या सिनेमांपासून ते त्याच्या खाजगी आयुष्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. त्यातच आमिरची पत्नी किरण राववरील प्रेमही दुनियेपासून लपून राहिलेले नाही. अनेक पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये आमीरसोबत किरणही बऱ्याच वेळा दिसून येते. आमिरचे हे पत्नीप्रेम एवढ्यावरच थांबलेलं नाही. आमिरने आपल्या लाडक्या पत्नीला अमेरिकेतल्या बेव्हेर्ली हिल्स इथे एक हॉलिडे होम गिफ्ट केलं आहे. या हॉलिडे होमची किंमत तब्बल ७५ कोटी रुपये आहे. मात्र पत्नीवरच्या प्रेमापुढे आमिरने त्याचीही पर्वा केली नाही.

* संजय दत्त – मान्यता दत्त : बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांचं एकमेकांवरचं प्रेम जगजाहीर आहे. संजय दत्तने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. चित्रपटसृष्टीत यशस्वी होत असतानाच संजयचं खाजगी आयुष्य बरंच वादग्रस्त राहिलंय. आयुष्यातल्या अनेक चढ-उतारांत संजयला मान्यताने खंबीरपणे साथ दिली. त्यातच संजूबाबाच्या गैरहजेरीत मान्यताने आपल्या मुलांची विशेष काळजी घेत त्यांचे पालनपोषण केले. या सगळ्याची परतफेड म्हणून किंवा मान्यतावरील प्रेम व्यक्त करताना संजयने तिला रोल्स रॉईस ही तब्बल ३ कोटी रुपयांची कार भेट म्हणून दिली.

* राज कुंद्रा – शिल्पा शेट्टी : हिंदी सिनेसृष्टीत जे जोडपं नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतं ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा. राजने शिल्पाला लग्नासाठी मागणी घालतानाच २० कॅरेटची हिऱ्यांची अंगठी भेट म्हणून दिली होती. या अंगठीची किंमत ३ कोटी रुपये होती व या बिग बजेट वेडिंग प्रपोजलची चर्चा बरेच दिवस प्रसारमाध्यमांत रंगली होती. यानंतर शिल्पाला लग्नाचे खास गिफ्ट म्हणून राजने दुबईतील बुर्ज-खलिफा या जगातल्या सगळ्यात उंच इमारतीच्या १९ व्या मजल्यावरील फ्लॅट दिला. हे कमी होतं म्हणून की काय आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स ही टीम खरेदी करून शिल्पाला गिफ्ट केली.

* विद्या बालन – सिद्धार्थ रॉय कपूर : अभिनेत्री विद्या बालनने २०१२ साली यूटीव्हीचे प्रमुख सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. एका खाजगी समारंभात विवाहबद्ध झालेल्या सिद्धार्थ-विद्याच्या जोडी एका गिफ्टमुळे चर्चेत आली होती.  आपल्या पत्नीवरच्या प्रेमापोटी सिध्दार्थने मुंबईतील जुहूमध्ये समुद्रकिनारी एक अलिशान फ्लॅट विद्याला गिफ्ट म्हणून दिला. आजूबाजूला अनेक प्रसिद्ध व्यक्तींची घरे असलेल्या या फ्लॅटची किंमत ३० कोटी रुपये इतकी आहे.

* राणी मुखर्जी – आदित्य चोप्रा : असं म्हणतात की प्रेम हे जगापासून अधिक काळ लपून राहू शकत नाही. असंच काहीसं घडलेलं ते अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्या बाबतीत. हे दोघे विवाहबद्ध व्हायच्या आधी म्हणजे सन २०११-१२ च्या दरम्यान त्यांच्या अफेयरची चर्चा बी टाऊन मध्ये सुरु होती. मात्र राणी व आदित्य या दोघांपैकी कोणीही या गोष्टीस दुजोरा देण्यास तयार नव्हते. त्याचवेळी आदित्यने २०१२ साली राणीला ऑडी ए8 डब्ल्यू12 ही गाडी गिफ्ट केली. या गाडीची किंमत १.२५ कोटी रुपये इतकी होती आणि तेव्हापासूनच हे दोघे जस्ट फ्रेंड्स नसल्याचं लक्षात आलं होतं.